उन्‍हाच्‍या झळांनी पक्षी बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उन्‍हाच्‍या झळांनी पक्षी बेजार
उन्‍हाच्‍या झळांनी पक्षी बेजार

उन्‍हाच्‍या झळांनी पक्षी बेजार

sakal_logo
By

मालाड, ता. १४ (बातमीदार) ः उन्हाच्‍या झळा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांसह पशू–पक्ष्‍यांनाही त्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा तापमानात आकाशात विहार करताना पक्ष्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन पक्षी मूर्च्छित होतात आणि कोसळतात. दर वर्षी उन्हाळ्यात अनेक पक्षी ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्यामुळे गच्चीवर, आवारात, रस्त्यावर पडलेले दिसतात.
मालाड भागातील पक्षीप्रेमींना उष्‍म्‍याचा त्रास जाणवलेले पक्षी आढळू लागले आहेत. येत्या काही दिवसांत उन्हाचा पारा अधिक वाढणार असून, पक्ष्यांसाठी आपल्‍या घराच्‍या खिडकीत, गच्‍चीवर पाणी, धान ठेवण्याचे आवाहन आता पक्षीप्रेमींकडून करण्‍यात येत आहे.
शहरात सध्‍या अनेक भागात गटारात, नाल्‍यात अथवा डबक्यात साचलेल्या पाण्यात हे पक्षी आपले शरीर आणि पंख भिजवून शरीर थंड करताना आढळत आहेत. यांच्‍यासाठी पक्षीप्रेमी पिण्यासाठी आपल्या छतावर आणि बाल्कनीत तसेच काहीजण झाडांवर पक्ष्‍यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करत असल्‍याने या पक्षांना मोठा दिलासा आणि आधार मिळत आहे.

‘उडाण’ने दिले पक्ष्‍यांना बळ
उडाण नावाची संस्था मालाड परिसरात पक्ष्‍यांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने पक्ष्‍यांवर उपचार केले जात आहेत. दर रविवारी उपचाराने बरे झालेल्‍या पक्ष्‍यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात संस्थेचे स्वयंसेवक सोडतात.

जानेवारी महिन्यात ७४३ पक्ष्‍यांवर उपचार; ९४ मृत्यू; ११० सुखरूप; ५३९ देखरेखीखाली
फेब्रुवारी महिन्यात ४८४ पक्ष्‍यांवर उपचार; ४५ मृत्‍यू; ७९ सुखरूप; ३६० देखरेखीखाली

शहरातील अनेक भाग ओसाड
वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे माणसांना नकोसे होत असतानाच अन्नाच्या शोधात घरट्याबाहेर पडणाऱ्या पक्ष्यांची अवस्था ही बिकट होऊ लागली आहे. शहरी भागात ठराविक पट्ट्यातच वनराई टिकून राहिली असून अनेक भाग हे ओसाड झाले आहेत. अशा भागांत अन्नाच्या शोधात पक्षी दूर अंतरावर उडत जातात. याच वेळी उन्‍हाळ्याच्या झळा त्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

दुपारच्या वेळी ऊन जास्त असल्याने या वेळेत पक्षीही झाडांचा आसरा घेत सावलीत रक्षण करीत आहेत; परंतु बऱ्याचदा काही पक्षी हे अन्नाच्या शोधात दूरवर उडून आल्याने त्यांना याचा फटका बसतो. सकाळ, संध्याकाळ लवकर घरट्याबाहेर पडून पशू-पक्षीही अन्न शोधून दुपारच्या वेळी घरट्यात विश्रांती करत असल्याचे दिसून आले आहेत.
- महेश बनकर, पक्षीमित्र