पदपथावरील सुशोभिकरणाची दुरवस्‍था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावरील सुशोभिकरणाची दुरवस्‍था
पदपथावरील सुशोभिकरणाची दुरवस्‍था

पदपथावरील सुशोभिकरणाची दुरवस्‍था

sakal_logo
By

कांदिवली, ता. १४ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील न्यू लिंक रोडवर मेट्रो व्यवस्थापनाने रेल्वे स्थानक परिसरासह दुभाजक आणि पदपथांचे सुशोभीकरण केले आहे; मात्र याची दुरवस्‍था झाली आहे. येथील पदपथावर आयताकृती बांधकाम करून लावण्यात आलेली शोभेची झाडे शेवटची घटका मोजत असल्‍याचे दिसून आले. पाणी आणि देखभालीचा अभाव यामुळे लाखो रुपये खर्च करून नव्याने ठिकठिकाणी निर्माण केलेल्या बागेची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांसह वृक्षप्रेमींमध्ये नारजी दिसून येत आहे.
मेट्रो व्यवस्थापनाने न्यू लिंक रोडवर डहाणूकर वाडी आणि कांदिवली पश्चिम मेट्रो स्टेशन दरम्यान ठिकठिकाणी आयताकृती बांधकाम केले आहे. सदर आयताकृती जागेत विविध फुलझाडे लावून बाग निर्माण केली आहे. यामुळे पदपथाचे सौंदर्य खुलले होते. मात्र काही दिवसांपासून या झाडांकडे दुर्लक्ष झाल्याने पाण्याअभावी झाडे सुकली आहेत. खत माती नसल्याने, घुशिंनी पोखरून जागोजागी खड्डे पाडले आहेत. लाखों रुपये खर्च करून निर्माण केलेल्या बागा सध्या शेवटच्या घटका मोजत आहेत. यामुळे प्रवासी, स्थानिक नागरिकांसह वृक्षप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मेट्रो व्यवस्थापनाने तातडीने लक्ष घालून खत माती आणि पाण्याची व्यवस्था करून, देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सुशोभीकरण केलेल्‍या भागाची पाहणी केली जाईल. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, देखभाल करण्यास सांगतो.
– अशोक सिंह, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए