
महामार्गावरील प्रवाशांची आरोग्यवर्धक निराला पसंती
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : काही दिवसांपासून उन्हामुळे अंगाची काहिली प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेक जण शीतपेयांचे सेवन करतात. मात्र सायन-पनवेल महामार्गावर असणाऱ्या आरोग्यवर्धक नीरा पेयाला प्रवाशांची अधिक पसंती आहे.
सध्या उन्हाचा पारा ३७ अंशांपर्यंत गेला आहे. त्यात महामार्गावरून जाताना उन्हासोबत तापलेल्या रस्त्याचे चटके बसत असल्याने नागरिक हैराण आहेत. पनवेल-सायन महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांची तहान सध्या नीरा भागवत आहे. नारळाच्या पाण्यासोबत नीरा हे पेयही निसर्गाचा चमत्कार समजला जातो. वाढत्या उन्हाळ्यात निराला अधिक मागणी आहे. कोरोना काळात नीरा केंद्रांना टाळे लागले होते. त्यामुळे नीराविक्री करणाऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते; पण आता सर्व पूर्वपदावर आले असून नीरा विक्रीच्या टपऱ्या पुन्हा उघडल्याने त्यांना अच्छे दिन आले आहेत.
थकवा कमी होण्यास मदत
सायन-पनवेल या सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गावर सरकारने नीराविक्रीस दिलेल्या मुभेमुळे या विक्रेत्यांना अच्छे दिन आले आहेत. ताडाच्या झाडाच्या खोडातून काढले जाणारे पाणी ‘नीरा’ म्हणून बाजारात उपलब्ध असते. अनेक जण शारीरिक थंडावा मिळावा, यासाठी नीरा पितात. नीरामधून अधिकाधिक कॅलरीज मिळतात. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे या दिवसातील थकवा कमी होण्यास मदत होते.
स्वस्तात आरोग्यवर्धक पेय
सायन-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावर आवर्जून नीरा विक्रेत्यांच्या टपऱ्या पाहायला मिळतात. १० ते १५ रुपये ग्लास (२५० मिली) दराने नीरा सहज उपलब्ध होते. त्यामुळे प्रवासी आणि नागरिक या स्वस्त आरोग्यवर्धक आणि चविष्ट पेयाला अधिक पसंती देतात. नीरा एक ग्लास पिऊन भागत नाही, म्हणून काही जण २ ते ३ ग्लास सहज फस्त करतात.
नीरा पिण्याचे फायदे
- हृदयविकाराचा किंवा रक्तदाबाचा त्रास असलेल्यांसाठी फायदेशीर.
- निरामुळे डिहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत.
- महिलांचेही शारीरिक स्वास्थ उत्तम राहण्यास उपयोगी.