
‘यिन’ भक्कम व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः ‘यिन’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भक्कम व्यासपीठ मिळण्यास मदत झाली आहे. आपल्या देशातील युवकांना सामाजिक कामांमध्ये हातभार लावण्यासाठी अशा व्यासपीठाची फारच गरज होती आणि यिनतर्फे ही संधी विद्यार्थ्यांना मिळतेय, असे कौतुकोद्गार ‘यिन संवाद’ उपक्रमात मान्यवरांनी काढले. ठाण्याच्या के.बी. पी. महाविद्यालयात रंगलेल्या यिन संवाद कार्यक्रमात महाविद्यालयातील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वेळी महाविद्यालयात यिन क्लबची स्थापनाही करण्यात आली.
यिन संवाद कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता. ११) के. बी. पी. महाविद्यालय, ठाणे येथील हॉलमध्ये करण्यात आले होते. यिन संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि अभिनेते संतोष व्हडगीर यांनी के. बी. पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास, व्यक्तिमत्व विकास, सामाजिक उपक्रम आदी विषयांवर मार्गदर्शन केले. लोकशाहीचा प्रगल्भ वापर कसा करायचा, लोकशाहीच्या माध्यमातून विविध समस्या कशा सोडवायच्या याची जाण विद्यार्थ्यांना होते. तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांप्रमाणे मी सुद्धा एन. सी. सी., एन. एस. एस., सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होतो. शालेय शिक्षण घेत असताना मी आर. डी. परेड, दिल्ली येथे सहभागी झालो होतो. परेडमध्ये सामील झाल्यांनतर आपल्या देशात विभिन्न संस्कृती असून सुद्धा आपण सगळे एकत्र कसे आहोत, याची मला प्रचिती आली, असे व्हडगीर म्हणाले.
---
भविष्यात सक्षम नेतृत्व घडेल
यिनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असे भक्कम व्यासपीठ दिलेत, यासाठी सर्वप्रथम ‘सकाळ’ माध्यम समूहाचे खूप आभार. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शॅडो मंत्रिमंडळाच्या माध्यमातून उच्चपदस्थ लोकांसोबत काम करण्याची संधी मिळण्यास मदत होईल. हे मंत्री भविष्यात नक्कीच स्थानिक पातळीवर, राज्यस्तरावर आणि देश पातळीवर नेतृत्व करतील. विविध पातळीवरील समस्यांचे नेतृत्व करतील आणि समस्या नक्कीच सोडवतील. यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडते, असे अभिनेते संतोष व्हडगीर यांनी सांगितले.
---
‘गोष्ट पैशापाण्याची’ वाचाच
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी गोष्ट पैश्यापाण्याची हे पुस्तक दिले. लेखक आणि व्यावसायिक प्रफुल्ल वानखेडे यांनी हे पुस्तक लिहिले आहे. दैनंदिन आयुष्यातील आर्थिक नियोजन कसे करावे, हे यामध्ये खूप सोप्या भाषेत सांगितले आहे. मराठी माणसाचा व्यावसायिक दृष्टिकोन घडावा या तळमळीने लेखकाने हे पुस्तकात लिहिलंय. यिनचे जे ६ मूलमंत्र आहेत, त्यापैकी आर्थिक साक्षरता या मूलमंत्राच्या निमित्ताने तुम्ही हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे असे अभिनेते संतोष व्हडगीर यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : नवनिर्वाचीत यिन क्लब विद्यार्थ्यांसोबत अभिनेते संतोष व्हडगीर