
सार्वजनिक वाचनालयात महिलांचा सन्मान
कल्याण, ता. १४ (बातमीदार) ः स्त्री-पुरुष जेव्हा समान विचारांनी काम करतात, त्याच वेळी समाजाला पूर्णत्व लाभते. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा असूच शकत नाहीत. स्त्री ही घरावर आनंदाने डौलणारी ध्वजा आहे. संस्कृतीपासून दूर जाण्याच्या अनेक प्रक्रिया असतात, तशी भाषेचीही एक प्रक्रिया असते, असे असले तरी शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या वाचनालयाच्या वास्तूत आपण उभे आहोत, याचा अभिमान वाटतो. असे मत तत्त्वज्ञान विद्यापीठ मुंबईतील प्राध्यापिका डॉ. शुभदा जोशी यांनी मांडले. सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा व निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित झालेल्या आदिवासी धाडसी महिला हाली बरफ यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला. २० हजार रुपये रोख, १५० किलोच्या आसपास धान्य, अनेक जीवनावश्यक वस्तू तसेच साडीचोळी देऊन हाली बरफ यांना सन्मानित करण्यात आले. लोक मदतगार असतात, आपण केवळ मध्यस्थी असतो, असे प्रतिपादन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. याप्रसंगी तपस्या नेवे, संपदा पाल्नित्कार, राधिका गुप्ते, मीनल ठाकोर, डॉ. संगीता गोडबोले, सजीता लिमये, शुभांगी घुले, सोनाल गेंगजे, स्मिता सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. पाककला स्पर्धेत मयुरी मराठे प्रथम, मनीषा जोशी द्वितीय, कुंदा चंदने हिने तृतीय क्रमांक पटकावला; तर रांगोळी स्पर्धेत कल्पना ठाकरे प्रथम, सुषमा बहुलेकर द्वितीय, आर्या देशपांडे, निबंध स्पर्धेत प्रथम ज्योत्स्ना तानवडे, दितीय प्रेरणा धुरी, तृतीय विनिता देसाई तसेच म्हणींच्या स्पर्धेत सुमेधा परांजपे, गिरीजा काळे यांनी पारितोषिके पटकावली.