
वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा
विरार, ता. १४ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या वसई रोड रेल्वे स्थानकावरून कोकण रेल्वे मार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सोडण्यात यावी, अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे पश्चिम रेल्वेकडे करण्यात आली आहे. नायगाव ते डहाणू भागात कोकणवासीयांची वस्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने या मागणीसाठी आणि वसई रोड रेल्वे स्थानकाला टर्मिनल बनवण्याच्या मागणीसाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्यासह प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांशी भेट घेत निवेदन दिले आहे.
पश्चिम रेल्वेच्या वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणू परिसरात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील रहिवाशांची ४० टक्के लोकवस्ती आहे. यासाठी वसई-विरार परिसरातून कोकण रेल्वे मार्गावरती एक पॅसेंजर सुरू करण्यासाठी प्रवासी संघटनेची मागील पाच वर्षापासूनची ही मागणी आहे. विरार, नालासोपारा, वसई, नायगाव अशी चार रेल्वे स्थानके वसई-विरार या उपनगरात मध्ये येतात; मात्र यातील सर्वाधिक आवडीचे असे रेल्वे स्थानकाचा दर्जा म्हणून वसई रोड रेल्वे स्थानकाला प्रवाशांमार्फत मिळालेला आहे.
--------------
मागण्यांची लवकरच अंमलबजावणी
पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी विरार येथील वाढती लोकवस्ती लक्षात घेता बोरिवली व अंधेरी स्थानकाप्रमाणे विरार स्टेशनचाही मोठ्या प्रमाणात विस्तार करावा व रेल्वे ब्रिजची संख्या वाढवावी, अशी मागणी या वेळी केली. या वेळी प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडयार व सदस्य बाळ वेळकर उपस्थित होते. या प्रवाशांच्या अनेक मागण्यांसंदर्भात पश्चिम रेल्वेने सहकारात्मका दर्शवली असून लवकरच यांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन पश्चिम रेल्वेचे जनरल व्यवस्थापक अशोककुमार मिश्र यांनी दिल्याचे संघटनेच्या यशवंत जडयार यांनी सांगितले.