जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

नवीन पनवेल, ता. १४ (वार्ताहर)ः महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जीर्ण जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत. कळंबोली येथील पनवेल-मुंब्रा महामार्गालगत असलेली वाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे संबंधित विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळे लाखो लिटर पाण्याची दररोज नासाडी होत आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकीकडे तीव्र पाणीटंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे. कळंबोली सर्कल येथून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी जीर्णावस्थेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गळती लागली आहे. याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे, कळंबोली परिसरातील नागरिकांना जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत; पण त्यात अपयश आल्याने सध्या या परिसराला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. या संदर्भात एमजीपीचे अधिकारी प्रशांत पांढरपट्टे यांच्याकडे विचारणा केली असता शटडावून घेऊन जलवाहिनी दुरुस्त केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
----------------------------------
वाहनचालकांची कसरत
कळंबोली सर्कल ते कळंबोली स्टील मार्केट दरम्यान एमजीपीची पाईपलाईन फुटल्यामुळे कळंबोली स्टील मार्केट प्रवेशद्वारावर पाण्याचे तळे साचत आहे. गेल्या पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचल्याने मोठा खड्डा पडला होता; परंतु लोखंड बाजार समितीने हा रस्ता दुरुस्त केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी पुन्हा पाणी साचत असल्यामुळे कळंबोली स्टील मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
---------------------------------------------------------
जुनाट झालेल्या वाहिन्या बदलण्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यात जुन्या वाहिन्या आणि त्यातून जाणारे लाखो लिटर पाणी रोज दृष्टीस पडते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला तसेच सिडकोला याविषयी वारंवार तक्रारी करूनही पाणीगळतीकडे दुर्लक्ष होत आहे.
- प्रशांत रणवरे, सामाजिक कार्यकर्ते, कळंबोली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com