
जुन्या पेन्शनसाठी लढा कायमस्वरूपी
पोलादपूर, ता. १४ (बातमीदार)ः जुन्या पेन्शनचा लढा शासन मान्य करत नाही, तोपर्यंत लढा चालू ठेवणार असल्याचा, निर्धार अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे यांनी पोलादपूर येथे केला आहे. तसेच या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिल्याने शासकीय स्तरावर निर्णय होईल, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.
जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचारी व शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामध्ये जुनी पेन्शन मागणी मंजूर झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला. या वेळी सकाळी ११ वाजता विविध संघटना एकत्र येत महामार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या वेळी पोलादपूर तालुक्यातील विविध संघटना संपात सहभागी झाल्या होत्या. त्यात समन्वय समिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक परिषद, अखिल रायगड जिल्हा शिक्षक संघ, अखिल रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, महसूल विभाग ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.