
पालघरमध्ये संपाला शंभर टक्के प्रतिसाद
पालघर, ता. १४ ( बातमीदार) : पालघर तालुक्यात सरकारी निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. शासकीय सर्व जिल्हा कार्यालये, तालुका व ग्रामीण भागातील तलाठी, ग्रामसेवक मंडळ, अधिकारी, आरोग्य कर्मचारी संपावर गेल्याने सर्व शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. माध्यमिक, प्राथमिक शाळा बंद होत्या. मात्र, दहावी-बारावीची परीक्षा सुरळीत सुरू असून यासाठी शिक्षकांनी सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे परीक्षेला मात्र कोणताही अडथळा आला नाही.
सरकारी, निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे पालघर तालुक्यातील शासकीय सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजपत्रित अधिकारी कार्यालयामध्ये हजर होते. एकूण ४८० अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी ३९९ कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागीय कार्यालय बंद असल्याने कामासाठी आलेल्या तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, डहाणू या परिसरातील शेकडो लोकांना माघारी जावे लागले. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वनविभाग जमीन हस्तांतरणासाठी शेकडो आदिवासी महिला-पुरुष कामासाठी आले असताना कर्मचारी संपावर असल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले. काहींच्या जमीन व इतर बाबींसाठी सुनावण्या होत्या. या सुनावणीसाठी सुद्धा नागरिक आले होते. मात्र, सुनावणी रद्द झाल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले.
----------------------------------
नागरीक उन्हात, कर्मचारी संपात
जिल्हा परिषदेतील सर्व विभागांमध्ये कर्मचारी संपावर होते. हे कर्मचारी कार्यालयाबाहेर एकत्र जमा झाले होते. जिल्हा परिषदेत कामासाठी आलेल्या नागरिकांनाही माघारी फिरावे लागले. पालघर तहसील कार्यालयात सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तेथेही कार्यालयात शुकशुकाट होता. पंचायत समितीमध्येही कर्मचारी संपावर असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांना परत फिरावे लागले. संप शंभर टक्के यशस्वी झाल्याचे पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व समन्वय समितीचे सदस्य गणेश प्रधान यांनी सांगितले