घाटकोपरमध्ये मोकाट गुरांमुळे अस्वच्छता

घाटकोपरमध्ये मोकाट गुरांमुळे अस्वच्छता

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) ः डिसेंबर महिन्यात राज्य शासन आणि मुंबई महापालिकेने राज्यात स्वच्छता जनजागृती अभियान राबवले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घाटकोपर पूर्वेतील नीलयोग मॉल येथील रस्त्यावर स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला. ज्या ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम राबवत स्वतः साफसफाई केली होती, त्याच ठिकाणांना आता गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पूर्वेकडील पालिकेच्या चौक्यांसमोरच चक्क गुरे बांधली जात आहेत; तर या भागातील भर रस्त्यांवरून अनेक गुरे मोकाट फिरत असल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळादेखील निर्माण होत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी वैतागले आहेत. घाटकोपर येथील पालिका विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर नीलयोग मॉलच्या समोर पालिकेच्या घनकचरा विभागाच्या दोन चौक्या आहेत. त्यांच्या समोर गुरे बांधण्यात येत आहेत; तर बाजूच्या पदपथावर अक्षरशः तबेला सुरू झाल्‍याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे शेण-मूत्र रस्त्यावर पसरत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन येथील रेल्वे स्थानकातून रेल्वे पोलिस वसाहतीकडे जाण्यासाठी रिक्षा पकडणाऱ्या प्रवाशांना आणि नीलयोग मॉल चौकातून रिक्षा पकडणाऱ्या तसेच बस प्रवाशांना ऐन गर्दीच्या वेळी त्रास होत आहे.
या ठिकाणी असलेल्या चौकातून अनेक रस्ते विविध ठिकाणी जातात. त्यामुळे सकाळी आणि खास करून संध्याकाळी येथे मोठी गर्दी असते. मात्र अशा वेळी येथून गायींचा वावर भररस्त्यांवरून होत असल्याने नागरिक त्रासले आहेत, असे काहींनी याबाबत सांगितले. दरम्यान, पालिकेच्या चौक्यांच्या बाजूला आणि समोर अनेक गायी पूर्ण वेळ बांधल्या जातात. त्यामुळे या परिसराला गोठ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

स्‍वच्‍छता मोहिमेपुरते लक्ष
मंत्री मंगलप्रभात लोढा हे जेव्हा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी या भागात आले होते; त्या वेळी एन विभागातील घनकचरा तसेच इतर विभागातील अधिकारीही याच ठिकाणी त्यांच्यासोबत स्वच्छता करताना दिसत होते. मात्र आता या ठिकाणी कोणीही अधिकारी ढुंकूनही पाहत नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुरांवर कारवाईस टाळाटाळ?
पालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी या गुरांवरील कारवाई आमच्या हाती नसून, पालिकेच्या देवनार कत्तलखाना यांच्याकडे असल्याचे सांगून हात वर करत आहेत. त्यामुळे घाटकोपर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील मेट्रो पुलाखालील मोकाट गुरांवर नक्की कोण कारवाई करणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

गुरांवर कारवाईचा विषय देवनार कत्तलखाना विभागाच्या अखत्यारीत आहे. तेथील अधिकारी याबाबत कारवाई करू शकतात, आम्ही नाही.
– सूर्यकांत सातपुते, सहायक अभियंता, घनकचरा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com