
हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : नेरूळमधील एका मॉलमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पोट रिपॉट हुक्का पार्लरवर नेरूळ पोलिसांनी सोमवारी पहाटे कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले असून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेरूळमधील सेंच्युरियन मॉलमध्ये पहाटेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती नेरूळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन ढगे यांच्यासह पथकाने सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास मॉलमधील पोट रिपॉट हुक्का पार्लरवर छापा मारला होता. यावेळी हुक्का पार्लरमध्ये काही ग्राहक हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी हुक्का पार्लरचा चालक अमन तिवारी (२१) व वेटर प्रल्हाद मंडल (२०) व राज दरेकर (२२) यांच्यासह हुक्का ओढण्यासाठी बसलेले ग्राहकांविरोधात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.