संपकाळात गैरसोयीने मनस्ताप

संपकाळात गैरसोयीने मनस्ताप

वाशी, ता. १४ (बातमीदार) ः जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १४) राज्यभरातील विविध विभागांच्या कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात हजारो शासकीय कर्मचारी सहभागी झाले असून नवी मुंबईतदेखील या आंदोलनाचे पडसाद दिसून आले. यामुळे कोकण भवन, आरटीओ अशा प्रशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज ठप्प होते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी हे सर्व कर्मचारी संपावर आहेत. नवी मुंबईतदेखील कोकण भवन, आरटीओ कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने त्याचा ताण प्रशासनावर पडला आहे. कोकण भवन येथील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. जवळपास कोकण भवनमधील दोन हजार कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे कोकण भवनमधील प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याने जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना या आंदोलनाचा फटका बसला.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होताना काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांमध्ये तसेच विभाग कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांची कोणतीच गैरसोय झाली नाही. तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्येही दैनंदिन कामकाज सुरू असल्याची माहिती वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी दिली.
------------------------------
आरटीओ विभागात बंदमुळे गैरसोय
आरटीओ विभागातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे कामकाज पूर्णपणे बंद होते. या वेळी आंदोलकांनी जोपर्यंत सरकार जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात आलेल्यांची गैरसोय झाल्याची माहिती उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.
--------------------------------
काळ्या फिती लावून पालिका कर्मचारी सहभागी
राज्यभरात पुकारलेल्या संपामुळे आरटीओ, मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या कोकण भवनमधील महसूल, जातपडताळणी आदी कार्यालयांतील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. नवी मुंबईतील विविध प्रशासकीय भागांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत; मात्र नवी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होताना काळ्या फिती लावून कामकाज सुरू ठेवल्यामुळे पालिकेच्या आरोग्य व शिक्षण विभागांवर या संपाचा कोणताच परिणाम झाला नाही.
---------------------------------------
कोकण भवनमध्ये शंभर टक्के बंद
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात कोकण भवनमधील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी १०० टक्के यशस्वी सहभाग नोंदवला. यामुळे कामानिमित्त कोकण भवनात येणाऱ्या अभ्यागतांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
------------------------------------------
पनवेलमध्ये समन्वय समितीचा मोर्चा
जुनी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी पनवेल तालुका समन्वय समितीने मोर्चा काढला होता. पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून निघालेल्या मोर्चामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, ग्रामपंचायत, कंत्राटी कर्मचारी, पनवेल तालुका समन्वय समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. पनवेल पंचायत समितीतून हा मोर्चा उड्डाण पुलाखालून तहसील कार्यालयापर्यंत गेला. याप्रसंगी पनवेल न्यायालयातील कर्मचाऱ्यांनीही हाताला काळ्या फिती बांधून कोर्ट परिसरात निषेध व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com