
विकास आराखड्यामुळे मनस्ताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : नवी मुंबई महापालिकेने घोषित केलेल्या विकास आराखड्याच्या प्रारूप मसुद्यावर नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर मंगळवार (ता. १४) पासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी झालेल्या सुनावण्यांपैकी तब्बल ६५० हरकती बिनकामाच्या ठरल्या असल्याने वेळेसह केलेली तयारी वाया गेल्याने पालिका अधिकाऱ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.
नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा आधीपासूनच वादात सापडला आहे. हा आराखडा कोणी तयार करण्यापासून ते आराखड्यात टाकण्यात आलेल्या आरक्षणांपर्यंत सर्वच बाबींना वादाला तोंड फोडले आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने सादर केलेल्या विकास आराखड्यावर तब्बल १५ हजार ८९० हरकती व सूचना आल्या आहेत. या हरकतींवर आजपासून सुनावणी सुरू झाली. यावेळी ऐरोली आणि बेलापूर विभागातील नागरिकांना आज सुनावण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे बेलापूर येथील टाटानगर आणि पंचशीलनगर येथील नागरिकांनी हजेरी लावली. मात्र, महापालिकेत विकास आराखड्यावर सुनावणी सुरू असल्याची माहिती या नागरिकांना नसल्याने चार वेळा झालेल्या बैठकांमधून तब्बल ६५० लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली होती. विशेष म्हणजे, कोणीतरी घर मिळणार आहे, अशी माहिती दिली असल्यामुळे घरासाठी नसून विकास आराखड्यावर असल्याचे सांगितल्यानंतर या नागरिकांना माघारी फिरावे लागले. परंतु, तोपर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नागरिकांची समजूत काढेपर्यंत नाकीनऊ आले होते. दरम्यान पहिल्याच दिवशी आलेल्या सुनावण्यापैंकी ९० टक्के हरकतींचे अर्ज बोगस निघाल्यामुळे आगामी सुनावणीच्या वेळेस अशा अर्जांसाठी वेगळे नियोजन करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
---------------------------------------------
तथ्यहीन हरकतींचा भरणा
विकास आराखड्याचा प्रारूप मसुदा जाहीर झाला, तेव्हा त्यावर हरकत आणि सूचना घेण्यासाठी महापालिकेने १० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, ही मुदत कमी पडत असल्याची काही सामाजिक संघटनांनी ओरड आहे. तसेच पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकत नोंदवण्यासाठी वेळ दिली. नंतरच्या वाढलेल्या वेळेत हरकतींचा पाऊस पडला. मात्र, या हरकती तथ्यहीन असल्याचे प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.
-----------------------------------------------
आम्हाला घर कोण देईल?
तुम्हाला घर हवे असेल तर हा फॉर्म भरून द्या, असे सांगणारे काही लोक आमच्या घरी आले होते. आपल्याला घर मिळेल, या आशेने आम्ही हा फॉर्म भरून दिला. पण इकडे आल्यावर आम्हाला समजले की ही बैठक घरासाठी नसून विकास आराखड्याच्या हरकतींसाठी आहे. त्यामुळे इकडे येऊन आमच्या पदरी निराशा पडल्याचे एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
---------------------------------------------------
आज घणसोलीत सुनावणी
नवी मुंबई महापालिकेच्या प्रारूप विकास योजनेवर प्राप्त सूचना व हरकतींची सुनावणी १४ ते २९ मार्च या कालावधीत पार पडणार आहेत. आज बेलापूर आणि ऐरोलीतील नागरिकांची सुनावणी झाल्यानंतर उद्या (ता. १५) घणसोलीकरांसाठी सुनावणी होणार आहे.