शिवडी कोळीवाडा शाळेत वॉटर बेल संकल्पना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी कोळीवाडा शाळेत वॉटर बेल संकल्पना
शिवडी कोळीवाडा शाळेत वॉटर बेल संकल्पना

शिवडी कोळीवाडा शाळेत वॉटर बेल संकल्पना

sakal_logo
By

शिवडी, ता. १४ (बातमीदार) ः लहान मुलांचे दिवसातील पाच ते सात तास शाळेत जातात. या कालावधीत त्यांनी किमान तीन वेळा पाणी पिणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘वॉटर बेल’ ही संकल्पना राबवण्यास शिवडी कोळीवाडा पालिका शाळेतून सुरुवात झाली आहे.
मुलांना शाळेच्या वेळेत पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी मुंबईतील सर्व महापालिका शाळांमध्ये तसेच खासगी शाळांमध्ये ठराविक वेळाने घंटा वाजवावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी २०१९ मध्ये केली होती. याबाबतचा ठराव महापालिकेने नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर केला होता; मात्र कोरोना महामारीमुळे या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता शाळा पूर्ववत सुरू झाल्याने या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार शिवडी कोळीवाडा शाळेत ‘वॉटर बेल’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक पाराजी गोविंद खेमनार यांनी दिली.
केरळ राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण म्हणून घंटा वाजवली जाते. त्याचप्रमाणे मुंबईतील शाळांमध्ये एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली होती. सभागृहाने हा ठराव मंजूर केला होता व अभिप्रायासाठी प्रशासनाकडे पाठवला होता. शिक्षण विभागाने ही सूचना मान्य केली होती. या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना परिपत्रक पाठवले होते. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मूत्राशयाचे त्रास, उलटी होणे, भोवळ येणे, शरीरातील पाणी कमी होणे या समस्या मुलांना भेडसावणार नाहीत, असे सांगत प्रशासनाने या सूचनेचे स्वागत केले होते. तसेच २०२०-२१ च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात या सूचनेची घोषणाही करण्यात आली होती; मात्र त्यानंतर कोरोना टाळेबंदी लागू झाल्यामुळे शाळा बंद होत्या; मात्र आता शाळा पूर्ववत सुरू झाल्यामुळे या योजनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी लेखी पत्राद्वारे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार याची अंमलबजावणी झाली असून त्याअंतर्गत शिवडी कोळीवाडा शाळेत वॉटर बेल ही संकल्पना राबवण्यास सुरुवात झाली आहे.