निधीअभावी रुग्णालयाची रखडपट्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधीअभावी रुग्णालयाची रखडपट्टी
निधीअभावी रुग्णालयाची रखडपट्टी

निधीअभावी रुग्णालयाची रखडपट्टी

sakal_logo
By

मनोर, ता. १४ (बातमीदार) : दोन वर्षांपूर्वी बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या जागेचा प्रश्न मिटल्यानंतर इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने बोईसर शहरासह तारापूर औद्योगिक वसाहतीतील रुग्णांची परवड होत आहे. लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कमी पडत नसल्याने राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप केला जात आहे. ग्रामीण रुग्णालयाअभावी बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहतीतील रुग्णांना उपचारासाठी गुजरात राज्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
भाडे तत्वावर घेतलेली बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत अतिशय धोकादायक बनल्याने दोन वर्षांपासून हे रुग्णालय टिमा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले आहे. ३० खाटांच्या नवीन रुगालयाच्या इमारतीसाठी जागा आरक्षित करूनदेखील राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने परिसरातील गरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहत आणि लगतच्या गावांमधील जवळपास दोन लाख नागरिक व्यापार, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी बोईसर शहरावर अवलंबून आहेत. बोईसर शहरात पन्नासपेक्षा अधिक अद्ययावत सुविधा असलेली खाजगी हॉस्पिटल उपलब्ध आहेत. खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने त्यांना नाईलाजाने मुंबई, ठाणे, गुजरात आणि केंद्रशासीत प्रदेश सिल्वासा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत.

------------------
दीड एकर जागा आरक्षित
३० खाटांच्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी सरावली ग्रामपंचायत हद्दीतील महसूल विभागाची दीड एकर शासकीय जागा आरक्षित करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचा आराखडा आणि कामाचे अंदाजपत्रकदेखील सादर करण्यात आले आहे; मात्र दोन वर्षांपासून इमारतीच्या बांधकामासाठी अपेक्षित निधी उपलब्ध होत नसल्याने बोईसर आणि परिसरातील गरीब नागरिकांना आणखी काही वर्षे मोफत आणि चांगल्या उपचारांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

--------------------
तीन ठिकाणी स्थलांतर
बोईसर येथे २००६ साली ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाला मंजूरी देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या इमारतींसाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्याने ग्रामीण रुग्णालय नवापूर नाका येथील एका खाजगी इमारतीत भाडेतत्वावर सुरू होते; परंतु इमारत धोकादायक बनल्याने रुग्णालय सरावली जिल्हा परिषद शाळा, त्यानंतर दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आत्ता टिमा रुग्णालयाच्या इमारतीत रडतखडत सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात तपासणीसाठी रोज शंभरपेक्षा अधिकच्या संख्येने रुग्ण येत असतात. अशात मंजूर पदांपैकी पंधरा पदे रिक्त असल्याने अपुऱ्या मनुष्यबळाच्या आधारावर रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

-------------------
रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अजूनही निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध होताच इमारतीचे बांधकाम सुरू केले जाईल.
- डॉ संजय बोदडे, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर