करवाढमुक्‍तीचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवाढमुक्‍तीचा दिलासा
करवाढमुक्‍तीचा दिलासा

करवाढमुक्‍तीचा दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा : प्रसाद जोशी
वसई, ता. १४ : वसई-विरार महापालिकेने मुख्यालय सभागृहात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करताना कोणतीही करवाढ केली नसल्याचे जाहीर केले. खेळाडूंना प्रोत्साहन, अग्निशमन व परिवहन सेवेत सुधारणांसह आरोग्य सेवेसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शहरातील प्रकल्‍पांना चालना देण्‍याबरोबच अनेक विकासात्मक पावले उचलण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योजना आखण्‍यात आल्‍याचे दिसून येत आहे.

वसई-विरार शहर महापालिकेचा २०२२-२३ चा सुधारित अर्थसंकल्प व २०२३-२४ चा मूळ अर्थसंकल्प मंगळवारी वसई-विरार शहर महापालिका प्रशासक अनिलकुमार पवार यांनी सादर केला. पालिकेचा एकूण २७८०.८१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून, विविध विकास कामांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केल्याचे समोर येत आहे. यंदाच्‍या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ तसेच दरवाढ करण्यात आलेली नाही. याबाबत प्रशासनाशी चर्चा करून अर्थसंकल्पाला मंजुरी देणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.
----------------------------------
कोंडीतून सुटका नाहीच
वाहनतळांचा असलेला अभाव पाहता कोंडीची मोठी समस्या शहरातील नागरिकांना भेडसावत असते. अत्यावश्यक सेवांनाही या असुविधेचा मोठा फटका बसतो; मात्र बहुउद्देशीय वाहनतळ उभारण्याची घोषणा होऊनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. पालिकेच्‍या अर्थसंकल्पात कोंडीतून मोकळा श्वास घेण्यासाठी आर्थिक तरतूद केली नसल्याचे स्‍पष्‍ट होत आहे.
-------------------------------
सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना
अग्निशमन दल व्यवस्थापनासाठी गेल्या अर्थसंकल्पात चार कोटींची तरतूद करण्‍यात आली होती. यंदा यात वाढ होऊन ७ कोटी ९४ लक्ष इतकी तरतूद प्रस्तावित करण्‍यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.
---------
शहर स्वच्छता घनकचरा व्यवस्थापन
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत वेस्ट, ग्रीन वेस्ट तसेच बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. दैनंदिन साफसफाई, डास निर्मूलनासह सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात २४४ कोटी ३० लक्ष तरतूद करण्यात आली आहे.
-----
आरोग्य सेवांना बूस्टर
वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या पाहता केंद्र आणि रुग्णालये अपुरी पडत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेला बूस्टर देऊन नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. रुग्णालय व्यवस्थापनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ११४ कोटी ८२ लाख इतकी तरतूद करण्यात आली आहे.
---------------------
पाणीपुरवठ्यासाठी आर्थिक बळ
एमएमआरडीए अनुदानासह महापालिकेच्या खर्चातून कामे करण्यात येणार आहेत. देहर्जीसह अमृत पाणीपुरवठा योजना, खोलसा पाडा धरण व अन्य योजनेसाठी पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपुरवठा करणे, देखभाल दुरुस्ती व अन्य योजना पूर्ण करण्यासाठी यंदा महापालिकेने २०२३-२४ मध्ये ३१३ कोटी ६२ लक्ष रुपये इतकी तरतूद प्रस्तावित केली आहे
-------------------
‘हरित वसई विरार’चा नारा
पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकाधिक हिरवळ वसई-विरार शहरात निर्माण व्हावी म्हणून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २७ कोटी ५६ लक्ष रुपये इतकी तरतूद प्रस्तावित करण्‍यात आली आहे. शहरात वृक्षलागवड व संवर्धनाकडे लक्ष दिले जाणार आहे.
-------------------
जलतरणपटूंना संधी
शहरात नवीन जलतरण तलाव बांधणे व अस्तित्वात असलेल्या जलतरण तलावांची देखभाल करून नव्या जलतरण प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांना स्पर्धेसाठी संधी मिळावी म्हणून अद्ययावत जलतरण तलावाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी दोन कोटी इतकी तरतुद प्रस्तावित आहे.
--------------------
खेळाडूंना प्रोत्साहन
प्रभागातील शालेय कला क्रीडा महोत्सव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, मॅरेथॉन स्पर्धा व इतर क्रीडा विभागाच्या विविध योजनेसाठी ६२ कोटी २६ लक्ष इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
--------------------
तलाव सुशोभीकरण
तलावाचे पुनर्जिविकरण व सुशोभीकरण करण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पात निधी प्रस्तावित केला आहे. यात सरकारकडील अनुदानासह ६४ कोटी रुपयांची तरतूद असणार आहे.
उत्पन्नवाढीसाठी विविध योजना हाती घेण्‍यात आल्‍या आहेत.
--------------------------------------------------
----------------------------------------------
मालमत्तांच्‍या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभाग
उद्यान, तलाव व क्रीडांगणासाठी भरीव निधी
१२ ठिकाणी वैद्यकीय आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणार
----------------
कोट
लेखा विभागाने अर्थसंकल्प सादर केला आहे. पाणी, मूलभूत सुविधा यांच्यासह विविध योजनांसाठी निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर अभ्यास व चर्चा करून अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.
-अनिलकुमार पवार, प्रशासक, महापालिका