संपामुळे मुंबईकरांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपामुळे मुंबईकरांचे हाल
संपामुळे मुंबईकरांचे हाल

संपामुळे मुंबईकरांचे हाल

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करावी यासाठी कर्मचारी महासंघाने आज बेमुदत संप सुरू केल्याने शासकीय कार्यालये ओस पडली होती. त्यामुळे नागरिकांची कामे रखडली. शिक्षक संघटना आणि आरोग्य क्षेत्रातील संघटनांनी संपात सहभाग घेतल्याने त्या क्षेत्रावरही आज संपाचा परिणाम जाणवला. आझाद मैदानासह विविध ठिकाणी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.
पहिल्याच दिवशी मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरटीओ, परिवहन आयुक्त कार्यालयांसह सरकारी कार्यलयांत शुशुकाट होता. मंत्रालयासह मुंबईतील सुमारे ६८ शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वांत मोठा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला असून शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कामे खोळंबली असून विद्यार्थ्यांना वेळेत कागदपत्रे न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
---
पालिका कर्मचाऱ्यांचा संपाला पाठिंबा
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी संपात मुंबई महापालिका कर्मचारी सहभागी न होता मोर्चा काढून संपाला पाठिंबा दिला. कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेऊन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत चर्चा केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सकारात्मक आश्वासन पालिका आयुक्तांनी दिले आहे; मात्र याकडे दुर्लक्ष झाल्यास पालिका कर्मचाऱ्यांनाही संपात उतरावे लागेल, असा इशारा समन्वय समितीने दिला आहे.
...
रुग्णालयांतील कामांवर परिणाम
सर जे. जे. समूह रुग्णालयांतील दीड हजार परिचारिका आणि १२०० चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर आहेत. तृतीय श्रेणी कर्मचारी वर्गातील ७०० कर्मचारी संपावर गेले. त्यामुळे रुग्णालयात पहिल्या दिवसापासूनच संपाचा परिणाम दिसून आला. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे हाल झाले. या संपाचा ताण कनिष्ठ डॉक्टर्स, निवासी डॉक्टर्स, शिकाऊ नर्सिंग विद्यार्थी, कंत्राटी कर्मचारी आणि वरिष्ठ डॉक्टरांवर आला.
...
बारावीची लेखी परीक्षा सुरळीत
विविध शिक्षक संघटनांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षेच्या कामकाजात सहभाग नोंदवल्यामुळे मुंबई परिसरातील बारावीची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे; तर शिक्षकांच्या संपाला दिवसभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती, शिक्षक परिषद, महामुंबई‍ संस्थाचालक संघटना, माध्यमिक शाळा शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ आदी शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी राज्यव्यापी संपात आपला सहभाग नोंदवला. मुंबईत शिक्षक परिषदेने बॅलार्ड इस्टेट ते आझाद मैदानापर्यंत लाँगमार्च काढला. शिक्षण क्रांती संघटनेने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांतील प्रत्येक तहसील आणि जिल्हा कार्यालयात जाऊन द्वारसभा घेतल्या. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने मुंबईत प्रामख्याने अंधेरीतील भवन्स महाविद्यालय, दादर येथील रूपारेल, विद्याविहार येथील के. जे. सोमय्या आणि घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयांसमोर आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. आज मुंबईतील बहुतांश शाळा या सकाळच्या सत्रात सुरू होत्या; मात्र दुपारच्या सत्रात त्या बंद करण्यात आल्याने शाळांना लवकर सुट्टी देण्यात आली; तर दुपारच्या सत्रातील शाळा मात्र आज भरू शकल्या नसल्याचे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
...
प्राथमिक शिक्षक संघाची माघार
‘जुनी पेन्शन योजना राबवण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघा’ने जाहीर केली आहे. जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी सरकारला वेळ देण्याची संघाची तयारी असल्याचे सांगत या संपातून माघार घेत असल्याची घोषणा प्रथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केली.