
लग्नासाठी जमवलेले सव्वालाख गमावले
लग्नासाठी जमवलेली जमापुंजी खाक
मुंबई, ता. १४ : मुंबईतील मालाड पूर्वेला आप्पा पाडा येथे शेकडो झोपड्यांना लागलेल्या आगीमध्ये एका व्यक्तीला जीम गमवावा लागला. परंतु आगीच्या घटनेत अनेक संसार कोलमडून पडले आहेत. आगीची झळ बसलेल्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे विजय कांबळे यांनाही आगीच्या घटनेमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आपल्या पुतणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे आगीत खाक झाले. अनेक स्वप्नांची राखरांगोळी या आगीच्या घटनेमुळे झाल्याचे कांबळे यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून एक एक असा पैसा जोडत आम्ही पुतणीच्या लग्नासाठी सव्वा लाख रूपये जमवले होते. येत्या मे महिन्यातील लग्नासाठी कॅटरर्स आणि हॉलचे पैसे देण्यासाठी ही रक्कम घरात ठेवली होती; पण त्याआधीच काळाने आमच्यासमोरील आव्हान आता आणखी कठीण करून ठेवले आहे. आगीचा भडका इतका मोठा होता की फक्त मुलाला घाईने घेऊन मी बाहेर पडलो. त्यामुळे इतर काहीच घेता आले नाही. त्यामध्ये कपाटात ठेवलेले सव्वा लाख रूपयेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अतिशय हताश अशी परिस्थिती आम्ही अनुभवतो आहोत, अशी भावना कांबळे यांनी बोलून दाखवली.
आमच्या घराच्या जळाल्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण वन विभाग आणि स्थानिक पोलिसांकडून झाले आहे. पण त्यापलीकडे कोणतीही मदत आम्हाला मिळालेली नाही. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लग्नासाठी पुन्हा एकदा पैसा कसा जमा करायचा, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे असल्याचे त्यांनी सांगितले.