
क्षुल्लक वादातून पत्नीची गळा चिरून हत्या
मुंबई, ता. १४ : क्षुल्लक वादातून घरातील चाकूने पत्नीवर वार करत तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घाटकोपरमध्ये मंगळवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी ३९ वर्षीय आरोपी संतोष मुरलीधर मिस्त्री याला अटक केली आहे.
आरोपीने भारतीय सैन्य दलात दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर तो एका जिममध्ये नोकरीला होता. पत्नीच्या हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेतच आरोपीने घाटकोपर पोलिस ठाण्यात जाऊन समर्पण केले. असल्फा परिसरातील साराभाई चाळीत ही घटना घडली. नमिता संतोष मिस्त्री असे मृत महिलेचे नाव आहे. दोघांमध्ये सतत खटके उडत होते. मंगळवारी सकाळी ६ वाजता संतोष घरी आला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली. याच वादातून त्याने घरातील चाकूने तिच्या मानेवर, गळ्यावर वार करत पत्नीची हत्या केली. हत्येनंतर रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्याने पोलिस ठाणे गाठून हत्येची कबुली दिली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत नमिताला राजावडी रुग्णालयात नेले; मात्र दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. नमिता आरोपीची तिसरी पत्नी असल्याची माहिती समजते आहे.