
नव्या पुलावरून जलवाहिनीस हिरवा कंदील
विरार, ता. १५ (बातमीदार) : पाणजू आणि भाईंदरच्या दरम्यान उभ्या असलेल्या जुन्या रेल्वे पुलाला जलवाहिनीचा अडसर होता. आता पाणजू गावासाठी पाणीपुरवठा करणारी ही जलवाहिनी नव्या रेल्वे पुलावरून टाकण्यास दिल्ली रेल्वे बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पाणजू गावाच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असून त्याचबरोबर जुन्या रेल्वे पुलाच्या तोडण्याचे कामही मार्गी लागणार आहे.
वसई तालुक्यातील पाणजू बेटाला भाईंदर येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी जलवाहिन्या या रेल्वेच्या ब्रिटिशकालीन जुन्या नायगाव-भाईंदर लोखंडी खाडी पुलावरून गेल्या होत्या. हा पूल २०२० मध्ये तोडण्यास सुरुवात केली असता त्या जलवाहिन्या नवीन पुलावर हलवण्यासाठी रेल्वेमार्फत पाणजू ग्रामपंचायतीला कळविले होते; मात्र निधीअभावी हे काम रखडले होते. जलवाहिन्या असल्याने पूलदेखील सद्यस्थितीत अर्धवट तोडण्यात आला आहे. त्यामुळे पाणजू ग्रामस्थांवर टांगती तलवार होती; मात्र आता ही समस्या दूर झाली असून दिल्ली रेल्वे बोर्डाने या जलवाहिन्या नवीन पुलावर हलवण्याच्या खर्चासाठी आणि कामासाठी मान्यता दिल्याचे याबाबत पाठपुरवठा करणाऱ्या खासदार राजेंद्र गावित यांना नुकताच कळवले आहे. पाणजू-भाईंदर दरम्यान मुंबईहून विरारला येणारी रेल्वे लाईन काढण्यात आली आहे. तसेच विरारहून मुंबईला जाणारी लाईन जलवाहिनीमुळे अजून काढण्यात आली नाही. या मार्गावर जलवाहिनी असल्याने जुना पूल तोडण्याचे कामही रखडले आहे.
===============
पूर्वी पाणजू गावाला पाणी होडीतून आणावे लागत होते; परंतु गावातील लोकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यावर आम्हाला जलजीवन मिशनअंतर्गत स्टेम कंपनीमार्फत भाईंदर येथून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुन्या पुलावरून जलवाहिन्या गेल्या असून याद्वारे आम्हा ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. जलवाहिन्या जुन्या झाल्याने अनेकदा जलवाहिन्या गळतीचे प्रकार घडले आहेत. नव्याने पुलावरून नव्या जलवाहिन्या टाकल्यास पाणीपुरवठा व्यवस्थित होणार आहे.
- विलास भोईर, माजी उपसरपंच, पाणजू