घरगुती हिंसाचारावर संवादशाळा

घरगुती हिंसाचारावर संवादशाळा

मालाड, ता. १५ (बातमीदार) ः जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, दहिसर शाखेने घरगुती हिंसाचार या विषयावर बोरिवली, वझिरा नाका येथील सुविद्यालय या शाळेच्या आवारात संवादशाळा आयोजित केली होती. संवादक म्हणून निशा फडतरे आणि सचिन थिटे यांनी या विषयाची मांडणी केली. तसेच स्वतःचे संरक्षण कसे करायचे; इतरांवर अन्याय होत असताना आपली भूमिका त्या वेळी काय असायला हवी, याबद्दलही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून महिला, मुली आणि पुरुषांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात महिला सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश याने केले आणि कार्यक्रमाचे सर्व नियोजन दहिसर शाखेचे कार्यकर्ते मारुती, अमित, गजानन, नीलेश, वर्षा, अमृता यांनी केले.

गुरु नानक महाविद्यालयाचा विधानभवन अभ्यास दौरा
धारावी, ता. १५ (बातमीदार) : गुरु नानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विधानभवन अभ्यास दौऱ्या’चे मंगळवारी (ता. १४) आयोजन करण्यात आले होते. राज्य शास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक सुमित खरात यांच्या नेतृत्वात राज्यशास्त्र विभागाच्या ६० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. भेटीदरम्यान विद्यार्थांनी विधानसभा आणि विधान परिषद या सदनांना भेट दिली व कामकाज कसे चालते हे प्रत्यक्षात अनुभवले. अभ्यास दौऱ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनात आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक सुमित खरात यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.

आजी झाली शेफ
मालाड, ता. १५ (बातमीदार) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ‘कौन बनेगा शेफ’ स्पर्धेत एकल महिलांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत एकल महिलांनी आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ बनवले. एकल महिलांच्या वर्गात नौशाद मिरकर या आजी विजेत्या ठरल्या; तर शबाना शेख उपविजेत्या आणि शबनम शेख यांनी तिसरा क्रमांक पटकवला. तसेच खुल्या महिला वर्गात रश्मी वालावलकर या विजेत्या झाल्या; तर शीतल मारू आणि गीता विजयन यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. या वेळी वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मनीषा क्षीरसागर, मार्था वाझ, जीनी राजन व लालजी कोरी हे प्रमुख पाहुणे म्‍हणून हजर होते. त्‍यांच्‍या हस्‍ते विजेत्‍यांना सन्मानित करण्यात आले.

कांदिवली पूर्वेला महारोजगार मेळावा
मुंबई, ता. १५ : बेरोजगार युवक आणि युवतींसाठी कांदिवली पूर्वेच्या प्रमोद महाजन मैदानावर शनिवारी (ता. १८) पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. ही माहिती भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिली. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असल्यामुळे प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये नोकरी मिळेल. याशिवाय विविध प्रकारचे प्रशिक्षणही देण्यात येईल, असेही भातखळकर म्हणाले. आर्य चाणक्य नगरातील प्रमोद महाजन मैदानात सकाळी ९ वाजता मेळाव्यास सुरुवात होईल. नामांकित उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता यासाठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा, मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची माहितीही या वेळी देण्यात येईल. https://jobfair.mysba.globalsapio.com/ या सकेंतस्‍थळावर ऑनलाईन नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अहिल्या शिक्षण केंद्रातर्फे शिक्षकांचा गुणगौरव
शिवडी, ता. १५ (बातमीदार) ः अहिल्या शिक्षण केंद्र या मुंबईतील अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या वतीने आत्माराम मोरजकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता. १४) अभ्युदय नगर येथील शाळेच्या सभागृहात करण्यात आले होते. यात कामगारांच्या मुलांसाठी आणि दुर्लक्षित, वंचित विद्यार्थ्यांसाठी विषेश शैक्षणिक कार्य करणाऱ्या अहिल्या शिक्षण केंद्रातील शिक्षकांबरोबरच मुंबई शहरातील इतर शाळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. संस्थेच्या संचालिका सुहासिनी मोरजकर, प्रज्ञा सोनसुरकर आणि देवेंद्र मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे हजर होते. या वेळी विद्या वाचस्पती, द. ग. सावंत, राजेंद्र गाडगे, संतोष परब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रमोद मोरजकर यांनी केले; तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती मोरजकर यांनी केले.

मूकबधिरांनी साकारल्या कलाकृती
प्रभादेवी, ता. १५ (बातमीदार) : मूकबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी विविध प्रकारची चित्रे रेखाटून तसेच हस्तकौशल्यातून अप्रतिम चित्रे आणि सुंदर हस्त कलाकृती साकारत कलात्मकतेचे नुकतेच दर्शन घडवले. स्टीफन हायस्कूल फॉर मूकबधिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वस्तूंचे आणि चित्रांचे प्रदर्शन शाळेच्या आवारात मांडण्यात आले होते. स्टीफन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ओलीवा मोरेस यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्याचेही उत्तम सादरीकरण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com