
वासिंद - कांबारे रस्त्याचे काम सुरू
वासिंद, ता. १५ (प्रतिनिधी) ः वासिंद-कांबारे या रस्त्यावर खैरशेत वांद्रे ते सावरोलीदरम्यान रखडलेले काम गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालक, प्रवाशांची त्रासदायक प्रवासातून सुटका होणार आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद-कांबारे या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांच्या देखरेखीखाली ॲन्यूटी हायब्रीडअंतर्गत झाले आहे. सदर रस्त्याचे काम संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते, परंतु खैरशेत वांद्रे ते सावरोलीदरम्यान रस्त्याचे काम वन्यजीव विभागाच्या परवानगीअभावी रखडले होते. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशांना या ठिकाणी खराब रस्ता असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता, परंतु सदरच्या रखडलेल्या कामासाठी वन विभागाची मंजुरी मिळाल्याने गेल्या आठ-दहा दिवसांपासून काम सुरू झाले असून येत्या चारपाच दिवसांत हे काम पूर्ण होणार असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, सदरचा वासिंद-कांबारे हा रस्ता शहापूर, वाडा, पालघर ते थेट गुजरातला जोडला असल्याने वाहनांची मोठी रहदारी या रस्त्यावर असून वाहनचालक व प्रवाशांना हा रस्ता सोईचा ठरत आहे.