तडीपार गुंडाला डोंबिवलीत अटक

तडीपार गुंडाला डोंबिवलीत अटक

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः लुटमारीच्या गुन्ह्यातील आरोपी दोन वर्षांसाठी तडीपार असतानाही पोलिसांना चकवा देत कल्याण परिसरात फिरत होते. कोल्हापूर येथून माल घेऊन येणाऱ्या ट्रकचालकाची लुटमार करत असताना यातील एकाला बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दुसरा त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. उमेर नाविद शेख (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याची रवानगी पुन्हा जिल्ह्याच्या बाहेर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कल्याण दूधनाका परिसरातील चौधरी मोहल्ला येथे राहणारा उमेर शेख (वय २५) व जहीर शेख या दोघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी दोन वर्षांसाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. तडीपार असतानाही हे गुंड काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये दाखल झाले होते. त्यांनी पुन्हा रात्रीच्या वेळेस परिसरात पादचारी, वाहनचालक यांची लुटमार करत दहशत माजवणे, दादागिरी करणे असे प्रकार करायला सुरवात केली होती. शनिवारी रात्री कोल्हापूर येथून एक मालवाहू ट्रक घेऊन चालक फिरोज शेख हे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे येत होते. त्यांनी आपला ट्रक बाजार समिती आवारात उभा करुन ते जेवण करण्यासाठी बाहेर जात होते. त्यावेळी उमेर व जहीर यांनी त्यांना अडवले. फिरोज यांना मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल, पैसे काढून घेतले. फिरोज हे त्यांना प्रतिकार करत होते. या वेळी गस्तीवर असलेल्या बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सचिन साळवी, प्रेम बागुल यांनी ही झटापट पाहून तेथे धाव घेतली. त्यावेळी जहीर हा अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. तर उमेर हा पोलिसांच्या तावडीत सापडला. फरार जहीर याचा शोध बाजारपेठ पोलिस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com