पापाणी चोरणाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पापाणी चोरणाऱ्यांवर कारवाई
पापाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

पापाणी चोरणाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ ः डोंबिवली जवळील काटई नाका ते खोणी या मार्गावरील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जलवाहिनीमधून पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात एमआयडीसीकडून मंगळवारी (ता.१४) कारवाई करण्यात आली. १२ सर्व्हिस सेंटरवर या वेळी कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी याप्रकरणी पाहणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने खडबडून जागे होत कारवाईला सुरुवात केली.

उन्हाचा पारा वाढत असून अनेक भागात पाण्याची टंचाई भेडसावत आहे. २७ गावांत पाण्याची कमतरता जाणवत असून याठिकाणी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी लागोलाग डोंबिवलीत मध्यरात्री धाड टाकत संदप परिसरात पालिकेच्या पाईपलाईनची पाहणी केली. यावेळी तीन ठिकाणी त्यांना पाणी चोरी होत असल्याचे आढळून आले होते. पालिकेच्या पाहणीत मात्र पाणी चोरीचा कोणताही प्रकार आढळून आला नाही. सामंत यांच्या दौऱ्यानंतर मात्र पालिका प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी पाणी चोरी होत आहे का याची पाहणी केली. तर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी देखील बदलापूर पाईपलाईन रोडवरील एमआयडीसी पाईपलाईनची पाहणी केली. यावेळी खोणी गाव ते काटई नाका या परिसरात एमआयडीसीच्या ६०० दशलक्ष लीटर पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिन्यांमधून पाणी चोरी केली जात असल्याचे आढळून आले.

बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात एमआयडीसीच्या अभियंत्यांनी अवैध जोडण्या शोधून त्याविरुद्ध कारवाई केली. १२ अवैध जोडण्या यावेळी आढळून आल्या असून याप्रकरणी सर्व्हिस सेंटरच्या मालकांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---
यांच्यावर कारवाई
जय सदगुरु सर्व्हिस सेंटर, रुख्मीणी हॉटेल समोरील सेंटर, झकास सर्व्हिस सेंटर, मनाली सर्व्हिस सेंटर, आई गावदेवी सर्व्हिस सेंटर, स्वामी समर्थ सर्व्हिस सेंटर, दक्ष सर्व्हिस सेंटर, गणराज सर्व्हिस सेंटर, आई गावदेवी सर्व्हिस सेंटर - खोणी नाका, गावदेवी सर्व्हिस सेंटर, पंकज सर्व्हिस सेंटर, जय भोलेनाथ सर्व्हिस सेंटर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन ठिकाणी अवैध जोडण्या आढळून आल्या असून त्या तोडून टाकत दोघा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली.