दमण बनावटीचे सात लाखांचे मद्य जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दमण बनावटीचे सात लाखांचे मद्य जप्त
दमण बनावटीचे सात लाखांचे मद्य जप्त

दमण बनावटीचे सात लाखांचे मद्य जप्त

sakal_logo
By

मनोर, ता. १५ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागाच्या पथकाने जव्हार तालुक्यातील जव्हार-सिल्वासा रस्त्यावर सापळा रचून केलेल्या कारवाईत दमण बनावटीच्या दारूची तस्करी रोखली आहे. कारमधील ४९ बॉक्स दमण बनावटीची दारू आणि कार मिळून सात लाख ५० हजारांच्या मुद्देमालासह कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्याच्या सीमेलगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणारी मद्य तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून सीमा भागात दिवस-रात्र गस्त घातली जात आहे. दारू तस्करी रोखण्यासाठी रविवारी (ता. ११) उत्पादन शुल्क विभागाच्या डहाणू विभागाचे निरीक्षक महेश धनशेट्टी यांच्या पथकाने जव्हार तालुक्यातील जव्हार-सिल्वासा रस्त्यावर सापळा रचला होता. रविवारी सकाळी जव्हार-सिल्वासा रस्त्यावरील गणेश नगर भागात एक संशयास्पद कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये दमण बनावटीचा दारूचा साठा आढळून आला.

दारूच्या साठ्यासह कार जप्त करण्यात आली आहे. दमण बनावटीच्या दारूचे ४९ बॉक्स आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार मिळून सात लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारचालकाविरोधात मुंबई दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारचालक मोहसिन खान यासीन खान पठान (वय ३६) मु. सोनीवाड, काठोर, ता. कामरेज, जि. सुरत, गुजरात याला अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कारवाईत डहाणू विभागाचे निरीक्षक महेश प्रधनशेट्टी, दुय्यम निरीक्षक के. बी. धिंदळे, जवान पी. जे. राठोड आणि वाहनचालकांनी भाग घेतला होता.