
वाहतूक कोंडी सुटेना!
पेण, ता. १५ (वार्ताहर) : कोकणातील पेण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील मुख्य बाजारपेठेत नेहमीच खरेदीसाठी गर्दी असते. बाजारपेठेतील रस्त्यावरून दुचाकी, तीन चाकीसह कंपनीच्या खासगी बसही धावत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी कमी होत नसल्याने पेणकरांना चालणेही कठीण झाले आहे. ज्येष्ठांसह महिलांना रस्ता ओलांडताना दमछाक सहन करावी लागते. ही त्रासदायक कोंडी कधी दूर होणार, याची वाट नागरिक पाहत आहेत.
पेण शहरातील मुख्य बाजारपेठ ही नेहमीच गजबजलेली असते. पेण धरमतर-खोपोली रस्त्यावरही ग्रामीण भागातील अनेक भाजीवाले, फळवाले, फुलवाले, सरबतच्या गाड्या, वडापावच्या हातगाड्या, पावभाजी, पाणीपुरी, केळीवाले यांनीही आपल्या हातगाड्यांसह दुकाने थाटली आहेत. त्यामुळे येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते. चावडीनाका ते पेट्रोल पंपपर्यंत दुचाकी, तीन चाकी गाड्या सतत धावत असतात. अनेकदा शाळेतील मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांची रस्ता ओलांडताना दमछाक होत आहे. त्यातच याच रस्त्यावरून कंपनीच्या खासगी बस धावत असल्याने शहरातील पेट्रोल पंप, एसटी स्टँड, नगरपालिका नाका, आंबेडकर चौक, युनिक बाजार, चावडी नाका येथे मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा परिणाम शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी त्रासदायक ठरत आहे. अनेकदा छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. त्यामुळे किमान खासगी वाहतूक तरी शहराच्या बाहेरून वळवण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेण शहरात दररोज खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. एकीकडे पेणमधील रस्ते अपुरे असल्याने खासगी वाहनांमुळे वाहतूक कोंडी लगेच होते. या वाहतूक कोंडीतून रस्ता ओलांडताना फार भीती वाटते. अनेकदा नागरिकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे नगरपालिका, पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष घालून खासगी कंपनीच्या बस, अवजड वाहने बायपास मार्गाने वळवावी.
- जयंत शिंदे, पेण
पेण नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरात येणाऱ्या खासगी बसना अन्य मार्गाने वळवण्यात याव्यात, यासाठी आरटीओ प्रशासनला पत्र दिले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यांवर बेशिस्त अनधिकृत हातगाड्यांमुळेही वाहतूक कोंडी होत आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येते. नगरपलिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दररोज पाहणी करत आहेत. कोणी आढळून आले, तर त्यांची हातगाडी जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- राजाराम नरुटे, प्रशासनाधिकारी, नगरपालिका, पेण