पाण्यासाठी मध्यरात्रीचे जागरण

पाण्यासाठी मध्यरात्रीचे जागरण

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरा नगर, गणपती पाडा, चुनाभट्टी यांसह तुर्भे परिसरातील विविध भागांमध्ये काही महिन्यांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. या ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा होत असून सलग दोन किंवा तीन दिवस पाणीपुरवठा होत नाही. काही ठिकाणी मध्यरात्री दोनच्या सुमारास पाणी सोडले जात असल्याने पाण्यासाठी रात्र जागवण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे.
तुर्भे येथे मध्यमवर्गीय आणि गरीब कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत. पाणी वाहून नेणाऱ्या काही जलवाहिन्या नाल्याखालून गेल्या आहेत. काही ठिकाणी टेकडीवर वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुर्भे परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील रहिवाशांना चार ते पाच तास थांबून राहावे लागत आहे. त्यामुळे कामावर जाण्यासही अडचण होते. विशेष म्हणजे, महापालिकेचे स्वतःचे मोरबे धारण असल्यामुळे नवी मुंबईत अनेक ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा होत आहे. मात्र तुर्भेसारख्या वस्तीत पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने महिला वर्गाचे हाल होत आहेत. तसेच काही वेळा तर नागरिकांना आजूबाजूच्या कंपन्यांमधून पाणी भरावे लागते. मात्र, एमआयडीसीकडून शटडाऊन लावले जात असल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची समस्या दूर करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
-------------------------
हाणामारीचे प्रकार
गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना रात्री-अपरात्री पाण्याची वाट बघावी लागते. ज्यावेळी पाणी येईल, त्यावेळी पाणी भरावे लागते. गेल्या काही दिवसांपूर्वी चुना भट्टी परिसरात सलग दोन दिवस पाणीपुरवठा झाला नसल्याने मनपाकडून टँकर पाठवला, मात्र पाण्याचा टँकर दुसरीकडे गेल्याने दोन गटांत बाचाबाचीतून हाणामारीपर्यंत वाद पोहचला होता.
---------------------------------
दूषित पाण्याचा पुरवठा
रात्री पाणी येत असल्याने अनेक जण पाणी मिळावे, या हेतूने मोटर लावतात. ज्यांच्याकडे मोटर नाही त्याला कमी दाबाने किंवा पाणीच येत नाही, अशावेळी भांडणे सुरू होतात. याशिवाय तुर्भे परिसरातील काही भागात आजही दूषित व अळ्यायुक्त पाणी नळाला येत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
----------------------------------------
रात्री-अपरात्री पाणीपुरवठा होत असल्याने त्याचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. यामुळे कधी-कधी रात्रभर जागून पाणी भरावे लागते. जलकुंभावर पाणी सोडणारे कर्मचारी मनमानीपणा करत असल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर एमआयडीसी, तसेच मनपाच्या तुर्भे विभाग कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाईल.
- महेश कोटीवले, शिवसेना उपशहर प्रमुख, उद्धव ठाकरे गट
--------------------------------
या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा हा एमआयडीसीकडून होत आहे. मात्र सध्या त्यांच्याकडून रात्री दोन वाजता पाणी पुरवठा केला जातो. याबाबत मनपा प्रशासनाकडून एमआयडीसीशी संपर्क साधून वेळेत पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- संजय देसाई, शहर अभियंता, मनपा
---------------------------------
गेल्या कित्येक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी तासनतास वाया जातात. इतर कामेही खोळंबून राहतात. तसेच पाण्यासाठी वादावादीचे प्रकारही वाढले आहेत.
- कांता चव्हाण, रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com