श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन पुढील वर्षी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन पुढील वर्षी होणार
श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन पुढील वर्षी होणार

श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन पुढील वर्षी होणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १५ : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम सध्या अत्यंत वेगात सुरू आहे. जानेवारी २०२४ च्या तिसऱ्या आठवड्यात आम्ही त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम लल्ला यांची स्थापना निश्चितपणे पूर्ण करणार असल्याचा विश्वास अयोध्येचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी डोंबिवलीत व्यक्त केला. डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडले, या वेळी ते बोलत होते.

रुग्णालयाच्या उद्‍घाटन सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेवगिरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील श्री राम मंदिराचे काम पूर्ण होईल. मंदिराचे काम त्यानंतरही चालूच राहणार आहे; परंतु मुख्य गाभारा, पहिला मजला आणि दर्शन व्यवस्थेचे काम होऊन जाईल आणि श्रीराम लल्लाचे नवीन भव्यदिव्य मंदिरात आगमन होईल, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मंदिराचे काम पूर्ण करून भगवान राम लल्लांना त्यांच्या मूळस्थानी आणून विराजमान करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असेही ते म्हणाले. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राजू पाटील, डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वागत यात्रेत सहभाग घेणार
कल्याण ग्रामीणमधील श्री मलंगगड येथे नवनाथ महाराजांची समाधी असून, मलंगगड मुक्तीसाठी हिंदू समाज एकवटला आहे. अशा प्रकारची जी काही स्थाने आहेत त्यांचा पुनरुद्धार व्हावा, असे माझे मत असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. स्वामी गोविंद देवगिरी महाराज डोंबिवलीमधील विविध कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. श्री गणेश मंदिर संस्थानच्या नववर्ष स्वगत यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमातही ते सहभागी होणार आहेत. ते म्हणाले, की अयोध्येतील राम मंदिराच्या कामामुळे मला सध्या वेळ फार कमी मिळतो. डोंबिवलीकरांनी मला त्यांच्या सेवेची संधी दिली याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.