पिचकारी बहाद्दर मोकाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिचकारी बहाद्दर मोकाट
पिचकारी बहाद्दर मोकाट

पिचकारी बहाद्दर मोकाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन सर्रासपणे सार्वजनिक जागेत थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा नवी मुंबई महापालिकेला विसर पडला आहे. कोविड काळात सार्वजनिक जागांवर उपद्रव करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेली पथके आता फक्त शोभेपुरतीच उरली आहेत. या पथकांमार्फत कारवाया थंडावल्यामुळे शहरातील मोक्याच्या ठिकाणांसोबत महत्त्वाचे रस्ते, पदपथ, चौक पिचकारी बहाद्दरांनी रंगवल्याने त्यांची स्वच्छता करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
नवी मुंबई महापालिकेतर्फे शहरात ‘माझी वसुंधरा आणि स्वच्छ सर्वेक्षण’ अशी मोहीम राबवण्यात येत आहे. रस्त्यावर लावलेल्या फलकांप्रमाणे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेस स्वच्छता होत आहे की नाही, याचा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत आढावा घेतला जात आहे. इतकेच नाही तर कामात दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. याशिवाय शहर सुशोभीकरणावर भर देताना ओसाड भिंतीवरील कलाकृती, चौकात स्मारके आणि प्रतिकृती उभारून सौंदर्यीकरण करणे, हरित पट्टे उभारण्याची कामेही पालिकेकडून केली जात आहेत; परंतु कोविड ओसरल्यानंतर पिचकारी बहाद्दरांवर कारवाईच होत नसल्याने पालिकेने सुशोभीकरण केलेले चौक, शहरातील रस्त्यांवरील दुभाजक, चौकातील स्मारके, रंगवलेल्या भिंती आदी ठिकाणांवर थुंकून रंगवल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणासाठी एकीकडे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे, पण दुसरीकडे पिचकरी बहाद्दर विद्रुपीकरणात मग्न आहेत.
------------------------------
वाणिज्य संकुलांना सर्वाधिक फटका
थुंकण्याच्या घाणेरड्या सवयींवर पालिकेमार्फत अंकुश लावण्यात येत नसल्याने वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी-बेलापूर या रेल्वेस्थानकांच्या आवारात असणाऱ्या वाणिज्य संकुलांभोवतीच्या जागांवरही थुंकणाऱ्यांमुळे रंग चढला आहे. वातावरणातील धुळीसह थुंकीमुळेही भिंती, दुभाजक रंगून गेले आहेत. त्यामुळे असे दुभाजक, चौक, स्मारके आणि भिंती धुण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
-------------------------
कारवाईचा उतरता आलेख
डिसेंबर २०२२, जानेवारी २०२३ आणि फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांत सार्वजनिक जागेवर थुंकणाऱ्या फक्त ९ लोकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २५० रुपये प्रतिव्यक्ती या दराने दोन हजार २५० रुपये वसूल केले; तर डिसेंबर २०२१, जानेवारी २०२२ आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये थुंकणाऱ्या १४ लोकांवर पालिकेने कारवाई केली होती. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२२ या महिन्यात सार्वजनिक जागेत थुंकणाऱ्या फक्त एका व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून २५० रुपये दंड वसूल केला आहे.
-----------------------
वातावरणातील धुळीमुळे खराब झालेल्या भिंती, दुभाजक आणि स्मारके धुण्याची मोहीम सुरू आहे. भिंतींवर आणि सार्वजनिक जागेत थुंकणाऱ्यांवर महापालिकेतर्फे कारवाई करण्यात येत आहे. ही मोहीम अधिक व्यापक करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- डॉ. बाबासाहेब राजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन