
कोल्डमिक्सऐवजी रिॲक्टिव्ह अस्फाल्टचा वापर
मुंबई, ता. १५ : मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून ४०० किमीच्या रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रिटीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, तर दुसरीकडे येत्या पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सऐवजी रॅपिड रिॲक्टिव्ह अस्फाल्टचा वापर करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात कोल्डमिक्सचा मुंबईच्या रस्त्यांवर फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले होते. मुंबई महापालिकेने गतवर्षी २४ प्रभागांमध्ये ३ हजार ४४ मेट्रिक टन कोल्डमिक्सचा पुरवठा केला होता; परंतु कोल्डमिक्सबाबत सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर पालिकेने पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला होता. या पद्धतीवर मोठी टीका झाल्यानंतर मुंबई महापालिकेने खड्डे बुजवण्याच्या नव्या पद्धतीचा तातडीने शोध सुरू केला होता. त्यामध्ये रिअॅक्टिव्ह अस्फाल्टचा वापर यशस्वी होत असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे भर पावसातही खड्डा बुजवल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत त्यावरून वाहतूक सुरू करणे शक्य असल्याचे सांगण्यात आले.
---
२.६८ कोटींची निविदा
महापालिकेने रिॲक्टिव्ह अस्फाल्टचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू केली असून मे. इकोग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर व डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीची निवड झाली. ऑस्ट्रिया आणि इस्रायल येथून या मटेरिअलचा पुरवठा केला जातो. या कामासाठी त्यांना दोन कोटी ६८ लाखांचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटदाराला संपूर्ण मुंबईतील खड्डे बुजवावे लागणार आहेत. तसेच खड्डे बुजवल्यानंतर पुढील ३६ महिने म्हणजे तीन वर्षे देखभाल-दुरुस्तीदेखील कंत्राटदाराला करावी लागणार आहे.
--
महागडे, पण उपयुक्त तंत्रज्ञान
मुंबई महापालिकेने यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी जिओ पॉलिमर मिक्स, फास्ट क्युरिंग कॉंक्रिट आणि कोल्डमिक्सचा वापर केला होता. मुंबईच्या रस्त्यांसाठी आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या कोल्डमिक्सच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट हे महागडे तंत्रज्ञान असले, तरीही वाहतुकीच्या आणि वेळेच्या बचतीच्या दृष्टीने मात्र हे तंत्रज्ञान उपयुक्त असे आहे.