
नागला बंदर किल्ल्याप्रकरणी एसआयटीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेला ठाणे घोडबंदर रोडवरील ऐतिहासिक नागला बंदर किल्ला शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक तथा पुरातत्व खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत व त्वरित अहवाल सादर करण्यास सांगितले, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महापालिका हद्दीमध्ये भाईंदर पाडा या गावामध्ये खाडी किनारी नागला बंदर हा ऐतिहासिक किल्ला आहे. पुरातत्व खात्यामध्ये व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दप्तरी ‘ऐतिहासिक किल्ला’ अशी याची नोंद आहे. आजपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या किल्ल्याची डागडुजी करणे आवश्यक होते, परंतु आजपर्यंत कुठल्याही शासकीय कार्यालयाने या ऐतिहासिक किल्याची दखल घेतल्याची नोंद दिसून आली नसल्याचे आमदार सरनाईकांनी निवेदनात म्हटले.
या किल्ल्याच्या आसपासची जमीन एका भूमाफियाने ताब्यात घेऊन हा किल्ला असलेला डोंगर पूर्णपणे तोडायला घेतला आहे. त्या ठिकाणी क्रशर मशीन बसवण्यात आली आहे. या डोंगरावरील दगड तोडून तेथील दगड व त्याचा भुसा विकला जात आहे, असा आरोप सरनाईक यांनी केला आहे. पर्यावरण खात्याच्या कुठल्याही नियमांचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व धुळीचे साम्रज्य पसरले होते. ज्या ठिकाणी किल्ला होता त्या ठिकाणी फक्त भग्न अवस्थेतील दोन भिंती आढळल्या असून त्या भिंतींवरच खडी क्रशरसाठी लागणारे साहित्य व भंगार सामान ठेवल्यामुळे किल्ल्याचे भग्नावशेषही दिसत नाहीत, असे सरनाईक यांनी सांगितले.