
संपामुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : जुन्या पेन्शनची योजना लागू करण्यासाठी शासकीय कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरल्याने आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांची कामे रखडली. मुंबईतील मंत्रालय, प्रशासकीय भवन, परिवहन आयुक्त कार्यालय, आरटीओ विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांत शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले.
आरटीओ कार्यालयात वाहनांशी संबंधित कामे, लायसन्सची कामे खोळंबली आहेत. ट्रान्सपोर्ट वाहतूकदारांचे फिटनेस, रिक्षा, टॅक्सी आणि नवीन वाहनांची नोंदणीसुद्धा ठप्प झाली आहे. लर्निंग लायसन्स काढलेल्या नागरिकांची पक्के लायसन्स काढण्याची तारीख संपत आल्याने नवीन लर्निंग लायसन्स काढावे लागणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय कामाचासुद्धा खोळंबा झाला असून अधिकारी कार्यालयांमध्ये आहे; मात्र कामासाठी लागणारे कर्मचारी नसल्याने एकट्या अधिकाऱ्याला आपले कार्यालय चालवण्याची वेळ आली आहे.
...
नोंदणी शाखेत मला काम होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संपावर आहेत याची माहिती नव्हती. त्यामुळे आता काम न होताच परत जावे लागत आहे.
- सागर सावला, नागरिक
...
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने घर तारण ठेवण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र काढायचे आहे. दोन दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी संप असल्याचे सांगून सध्या काम होणार नसल्याचे सांगत आहेत.
- दीपिका गणेश कानडे, नागरिक
...
जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी या वेळी पुकारण्यात आलेला संप ऐतिहासिक आहे. यामध्ये संपाला नक्कीच यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. मागणी मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे.
- राजू डवरी, अध्यक्ष, जिल्हाधिकारी मुंबई शहर कर्मचारी संघटना
...