
एच३एन२चा धोका वाढला
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : हरियाना, कर्नाटकनंतर आता महाराष्ट्रातही एच३एन२ इन्फ्ल्यूएंझाने रुग्णांचा जीव घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात एच३एन२मुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या तीनपैकी नागपूरमध्ये दोन आणि अहमदनगरमध्ये एक मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने हे तिन्ही मृत्यू संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.
मृत्यू निरीक्षण समितीच्या तपासणीनंतरच या मृत्यूंचे योग्य निदान होईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यासह राज्यात एच३एन२ इन्फ्ल्यूएंझाबाधित रुग्णांची संख्या आता ५८ झाली आहे.
मे महिन्यात दिसणारे फ्ल्यूचे रुग्ण या वेळी लवकर आढळून येत आहेत. हवामानातील बदलामुळे फ्ल्यूचे रुग्ण वेळेआधीच वाढल्याने आणि त्यातच एच३एन२ या नवीन स्ट्रेनचा प्रादुर्भाव झाल्याने आरोग्य विभाग चिंतेत आहे. राज्य निरीक्षण अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले, की या वर्षी जानेवारी ते १३ मार्च या कालावधीत एच३एन२चे ५८ रुग्ण आढळले आहेत. स्वाईन फ्ल्यूचे ३०३ रुग्ण आढळले आहेत. यासोबतच यंदा स्वाईन फ्ल्यूमुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सध्या एच३एन२चे ४८ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
...
इन्फ्ल्यूएंझा लसीकरण मोहीम
महाराष्ट्र सरकारने २०१५ पासून उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींना मोफत इन्फ्ल्यूएंझा लसीकरण स्वेच्छेने उपलब्ध करून दिले आहे. सध्या ही लस दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत गरोदर माता, मधुमेह, उच्च रक्तदाबग्रस्त व्यक्ती आणि आरोग्य कर्मचारी यांना दिली जात आहे. राज्याने २०२२-२३ या वर्षासाठी इन्फ्ल्यूएंझा लसीचे एक लाख डोस खरेदी केले आहेत. हे डोस विविध जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आले असून त्यापैकी ९९,७७८ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
...
मुंबईत वाढ नाही!
नीती आयोगाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतही याला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की आम्ही रुग्णालये आणि डॉक्टरांना इन्फ्ल्यूएंझासारखा आजार आणि गंभीर श्वसन संसर्गाच्या संशयित रुग्णांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आतापर्यंत आमच्या नियमित देखरेखीमध्ये मुंबईत इन्फ्ल्यूएंझा आजार आणि तीव्र श्वसन संसर्गाच्या प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.
...
सर्व रुग्णांची चाचणी आवश्यक नाही!
कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत एच३एन२ची एक किंवा दोन प्रकरणे दिसली असली तरी त्यात मोठी वाढ झालेली नाही. हवामानातील बदलामुळे आपल्याला खोकला, सर्दी आणि तापाची अनेक प्रकरणे दिसत आहेत; परंतु जोपर्यंत आम्ही चाचण्या करत नाही, तोपर्यंत त्यांना एच३एन२ किंवा इतर फ्ल्यू म्हणून घोषित करणे सोपे नाही. सर्व नमुन्यांची एच१एन१ प्रकरणांसाठी चाचणीचीदेखील शिफारस केलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार सर्व रुग्णांची एच१एन१ चाचणी करणे आवश्यक नाही असे सांगण्यात आले.
...
इन्फ्ल्यूएंझा म्हणजे काय?
इन्फ्ल्यूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. इन्फ्लूएंझा प्रकार ‘ए’चे वेगवेगळे उपप्रकार आहेत. ज्यामध्ये एच१एन१, एच२एन२,एच३एन२ यांचा समावेश आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे, धाप लागणे, न्यूमोनिया ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. यासंदर्भात सर्व आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची तपासणी करून लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जातात.
...
प्रतिबंध, नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना
- फ्ल्यूसारख्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण
- वर्गीकरणानुसार फ्ल्यूसारख्या रुग्णांवर त्वरित उपचार
- रुग्णालयांमध्ये आयसोलेशन कक्ष
- खासगी रुग्णालयांना स्वाईन फ्ल्यूच्या उपचारांसाठी मान्यता
- ओसेल्टामिविर औषध आणि इतर औषधांचा पुरेसा साठा
- इन्फ्ल्यूएंझा लसीकरण
- ओसेल्टामिवीर सर्व खासगी औषध दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना.
- फ्ल्यू प्रतिबंधासाठी जनजागृती.
...
सद्यस्थिती (१ जानेवारी ते १३ मार्च २०२३)
एकूण रुग्णांची तपासणी - २,५६,६२४
संक्रमित रुग्ण (एच१एन१) -३०३
संक्रमित रुग्ण (एच३एन२)- ५८
सध्या रुग्णालयात दाखल-४८
मृत्यू (एच१एन१)-३
संशयास्पद मृत्यू (एच३एन२)-३