स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन
स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन

स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ : मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहांत पाच हजार सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि इन्सिनेटर मशीन बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांसाठी अशा मशीनची खरेदी पालिकेच्या घनकचरा आणि व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येणार आहे. तब्बल ४५ कोटी रुपयांचा खर्च करून पहिल्यांदाच अशा प्रकारची मोठी यंत्रणा उभारण्याचा प्रयोग पालिका करणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मशीन बसवण्यासाठी पुढाकार घेणारी मुंबई पहिली नगरपालिका ठरणार आहे. मुंबईतील ५० टक्के स्वच्छतागृहांमध्ये अशा मशीन लागणार असल्याने नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांना आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

पालिका क्षेत्रात सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्याबाबत यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. मुंबईत कामाच्या निमित्ताने विविध कार्यालयांच्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मासिक पाळीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात सॅनिटरी पॅडची गरज असते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेच वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनेटर मशीनही बसवण्यात येणार आहेत. सार्वजनिक स्वच्छतागृहात आयओटी आणि एनालिटिक्सचा आधार घेत शास्त्रोक्त पद्धतीने असे तंत्रज्ञान वापरात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पाच हजार मशीनच्या खरेदीसाठी ‘रियलझेस्ट व्हेंडकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. मशीनच्या खरेदीसाठी ४३ कोटी ८७ लाख ३५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक मशीनसाठी ७६ हजार ५२८ रुपयांचा खर्च येणार आहे. एका वर्षाच्या हमी कालावधीनंतर त्यानंतरच्या दोन वर्षांसाठी कंपनीला आठ हजार रुपयांचा देखभाल खर्चही देण्यात येईल.

मशीन कसे काम करणार?
- एखाद्या स्वच्छतागृहाच्या ठिकाणी मशीनमध्ये किती नॅपकिन शिल्लक आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती संगणक व मोबाईल अॅपवर मिळू शकणार आहे. त्यासाठीच आयओटी आणि डेटालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- महिलांना हाताळण्यासाठी मशीन सोप्या पद्धतीने विकसित करण्यात आल्या आहेत. मशीनमध्ये ४५ ते ६० सॅनिटरी नॅपकीन असतील. त्या संपल्यानंतर नियमितपणे पुन्हा भरण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असेल.
- दिवसाला इन्सिलेटरमध्ये १५० नॅपकिनची विल्हेवाट लावता येणार आहे.

पाच हजार स्वच्छतागृहांत सुविधा
- मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहे ः १०,६८३
- मशीन लावण्यात येणारी स्वच्छतागृहे ः ५,०००
- मशीन खरेदीसाठी खर्च ः ४३,८७,३५,००० रु.
- एका मशीनचा खर्च ः ७६,५२८ रु.