
निर्देशांकांची पाचवी घसरण
मुंबई, ता. १५ : अमेरिकी बँका कोलमडण्याची भीती गेली असली तरी पुन्हा व्याजदरवाढीच्या भीतीने डोके वर काढल्यामुळे आज भारतीय शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी घसरले. आज ७१.१५ अंशांनी घसरलेला निफ्टी १७ हजारांच्या खाली बंद झाला; तर सेन्सेक्सदेखील ३४४.२९ अंशांनी घसरला.
अमेरिकेतील चलनवाढ कमी झाली, तसेच तेथील बँकांची अवस्था सुधारण्यासाठी सरकारने पावले उचलल्याच्या चांगल्या बातम्यांमुळे आज सकाळी सकारात्मक वातावरण होते. त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांची सुरुवात बऱ्यापैकी झाली होती. सेन्सेक्स ५८ हजारांवर गेला होता; मात्र युरोपीय मध्यवर्ती बँक दरवाढ करण्याच्या शक्यतेमुळे युरोपीय शेअर बाजारात घबराट पसरली व त्यामुळे दुपारनंतर भारतीय शेअर बाजारांमध्येही नफावसुली झाली. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५७,५५.९० अंशावर; तर निफ्टी १६,९७२.१५ अंशांवर स्थिरावला.
अमेरिकेतील बँकांच्या दोलायमान अवस्थेमुळे आता तेथील फेडरल बँक दरवाढ करणारच नाही किंवा फार तर अर्धा टक्क्याऐवजी पाव टक्के दरवाढ करेल अशी चर्चा बाजारात आहे, पण त्या आनंदावर युरोपीय मध्यवर्ती बँकेच्या दरवाढीच्या शक्यतेमुळे विरजण पडले. आज धातुनिर्मिती आणि औषध निर्मिती कंपन्यांचे शेअर नफ्यात होते; मात्र त्याखेरीज एफएमसीजी, बांधकाम व्यवसाय, अर्थ तसेच तेल आणि नैसर्गिक वायू ही क्षेत्रे तोटा दाखवत होती.
.........
पाच महिन्यांनंतर निफ्टी १७ हजारच्या खाली गेल्यामुळे बाजाराची अवस्था नाजूक दिसते आहे. काही दिवस तरी बाजार तोट्यातच राहील अशी शक्यता आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विस लिमिटेड.