भाईंदर रेल्वे स्थानकाला रिक्षांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाईंदर रेल्वे स्थानकाला रिक्षांचा विळखा
भाईंदर रेल्वे स्थानकाला रिक्षांचा विळखा

भाईंदर रेल्वे स्थानकाला रिक्षांचा विळखा

sakal_logo
By

प्रकाश लिमये : सकाळ वृत्तसेवा
भाईंदर : भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक परिसराला रिक्षांचा अक्षरश: विळखा पडला आहे. शहरातील रस्ते आधीच अरुंद असून, त्यात रस्त्यावरच उभ्या राहत असलेल्या रिक्षांमुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीने दररोज प्रवास करणारे तसेच आसपासचे रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. या समस्‍येवर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्‍यात येत आहे.

भाईंदर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग कारखाने आहेत. त्यामुळे या परिसरात भाईंदर बाहेरून येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. भाईंदर पूर्व भागात अगदी थेट इंद्रलोक, गोल्डन नेस्टपर्यंतच्या भागातील रहिवाशांना भाईंदर हे रेल्वेस्थानक जवळचे आहे. त्यामुळे भाईंदर पूर्व भागातून रेल्वे स्थानकात येणाऱ्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. हे सर्व प्रवासी भाईंदर पूर्व भागातील बी. पी. रोड तसेच नवघर रोड या दोन रस्त्यांवरुन भाईंदर रेल्वे स्थानकात येत असतात. या दोन्ही रस्त्यावरून स्थानकात येण्यासाठी प्रशांत हॉटेल नाका ते बंदरवाडी नाका या रस्त्यावरच यावे लागते.

मुळातच हा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यातच गेल्या काही वर्षात रिक्षांची संख्या क्षमतेपेक्षा वाढली आहे. रिक्षा परवाने खुले असल्यामुळे भाईंदर पूर्व येथील रिक्षांची संख्या वाढली आहे. शिवाय दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. याचा सर्व भार या अरुंद रस्त्यावर आहे. पूर्वी रेल्वे स्थानक परिसरातच रिक्षा स्टँड होता. त्यामुळे सर्व रिक्षा रेल्वेच्या संरक्षक भिंतीच्या आत उभ्या रहायच्या. मात्र, सध्या त्याठिकाणी रेल्वे पादचारी पुलाचे काम सुरू असून त्याचे सर्वसामान ठेवल्यामुळे हा स्टँड बंद करण्यात आला. परिणामी, सर्व रिक्षा बाहेर रस्त्यावरच उभ्या केल्या जातात. त्यातही रिक्षा रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या केल्या जात असल्याने आधीच अरुंद असलेला रस्ता आणखीनच आक्रसला जात आहे.
----------------------------------------------
कोट
वाहतूक कोंडीबाबत प्रवासी तसेच रहिवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. यावर उपाय म्हणून बंदरवाडी नाका ते प्रशांत हॉटेल नाका या रस्त्यावर एक दिशा मार्ग वाहतूक केली तर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
-रोहिदास पाटील, माजी नगरसेवक

रिक्षावाले बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. रिक्षाचालकांना काही सांगायला गेले तर ते अंगावर धावून येतात, शिवीगाळ करून भांडणे करतात.
-जितेंद्र जैन

आम्ही रेल्‍वे स्‍थानक परिसरातच रहातो. रिक्षांमुळे एवढी वाहतूक कोंडी होते की आम्हाला इमारतीमधून रस्त्यावर येण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागते. पोलिसांनी यात लक्ष घालून रिक्षाचालकांना शिस्त लावणे आवश्यक आहे.
-भावना साबू

सकाळच्या वेळी लोकल पकडण्यासाठी अतिशय गडबड असते. त्यात वाहतूक कोंडीमुळे स्थानकापासून लांबच रिक्षा सोडून पायी चालत रेल्वे स्थानक गाठावे लागते. त्यामुळे अनेक वेळा लोकल चुकण्याची भीती असते.
-वैशाली कोलते

रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी या भागात एक पोलिस चौकी ठेवावी व त्यात कायमस्वरुपी पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत आहोत. या भागात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. ते देखील अनेकवेळा बंद असतात.
-उत्तम पुरोहित
-----------------------------------
भाईंदर पूर्व भागात आधीच रस्ता अरुंद आहे; त्यात रेल्वे पुलाचे काम सुरू असल्यामुळे नाईलाजास्तव रिक्षा रस्त्यावर थांबत आहेत. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूककोंडी शक्य तितक्या लवकर सुरळीत व्हावी यासाठी पोलिस सातत्याने प्रयत्न करत असतात.
-देविदास हंडोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग