जिल्‍ह्यातील ४४ हजार रुग्णांवर मोफत उपचार

जिल्‍ह्यातील ४४ हजार रुग्णांवर मोफत उपचार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सरकारच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येते. त्यानुसार गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यातील ४४, ३८६ रुग्णांना मोफत उपचार मिळाले असून त्यासाठी १२३ कोटी ३२ लाखांची बिले मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे ही योजना जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

राज्य सरकारने २०१२ मध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली होती. २०१७ मध्ये या योजनेचे महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले. काही वर्षांपासून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना एकत्रित राबवण्यात येत आहे. १ एप्रिल २०२२ ते १२ मार्च २०२३ पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ४४,३८६ रुग्णांना या योजनेंतर्गत मोफत उपचार मिळाले असून त्यासाठी १२३ कोटी ३२ लाखांची देयके मंजूर झाली आहेत. ती संबंधित रुग्णालयांना दिली आहेत; तर काही प्रक्रियेत आहेत. लाभार्थी कुटुंबास दीड लाखापर्यंतच्या उपचार, शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होती. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात ही मर्यादा पाच लाखापर्यंत करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

काय आहे जनआरोग्य योजना?
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गंभीर आजारी रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे ही योजना राबवण्यात येते.
- गंभीर आजारांवर मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. त्यासाठी ९६० प्रकारचे पॅकेज संलग्न असलेल्या राज्यातील ९९८ रुग्णालयांतून उपलब्ध आहे.
------------------------
कोट
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४७ खासगी आणि ११ सरकारी रुग्णालयात कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया, मेंदू व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग अशा १,२०९ गंभीर आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येतात. आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा.
- डॉ. रवींद्र जगतकर, ठाणे जिल्हा समन्वयक, म. जो. फु. जनआरोग्य योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com