
नेरूळमधील उद्यानांना अवकळा
नेरूळ, ता. १६ (बातमीदार)ः नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस भिकारी, गर्दुल्ल्यांची संख्या वाढत चालली आहे. एकीकडे वर्दळीच्या रस्त्यांसह चौका चौकांमध्ये भिकारी, गर्दुल्ल्यांची संख्या वाढत असताना आता नेरूळमधील उद्यानांमध्येदेखील घुसखोरी केली जात असल्याने नवी मुंबई शहराला नवे रूप देण्याच्या महापालिकेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
सुशिक्षित करण्यासाठी जागा मिळेल, तिथे उद्याने उभारून उद्यानाची योग्य निगा राखली जात होती. मात्र, आता पुन्हा उद्यानांना बकाल स्वरूप येत आहे. नेरूळ, सेक्टर ९, बाबासाहेब आंबेडकर उद्यानात अनेक लोक फेरफटका मारण्यासाठी येतात; परंतु उद्याच्या गेटवरच कचऱ्याचे ढीग साचलेले आहे; तर उद्यानाबाहेर दारूच्या बाटल्यादेखील पडलेल्या आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी उद्यानात भिकारी व गर्दुल्ले विश्रांती घेत असल्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे.
-------------------------------------
चोरीच्या घटनांमुळे भीती
चाचा नेहरू उद्याने गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांची विश्रांतीचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे उद्यानांमध्ये येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक वेळा येथे चोरीच्या घटनादेखील घडल्या असल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
--------------------
अनेक दिवसांपासून उद्यानांमधील गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा वावर वाढला आहे. दुपारच्या वेळी बाकड्यावर झोपलेल्या भिकाऱ्यांमुळे उद्यानामध्ये येणाऱ्यांची गैरसोय होत आहे.
- पूजा सूर्यवंशी, रहिवासी
-------------------------
नवी मुंबई महापालिकेने काही उद्यानांमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. तसेच उद्यानांमधील गैरसोयींचा आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
- नितीन नार्वेकर, उपायुक्त, उद्यान विभाग