कोपर रेल्वे स्थानकालगत बेकायदा बांधकाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपर रेल्वे स्थानकालगत बेकायदा बांधकाम?
कोपर रेल्वे स्थानकालगत बेकायदा बांधकाम?

कोपर रेल्वे स्थानकालगत बेकायदा बांधकाम?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ ः मध्य रेल्वे मार्ग आणि दिवा वसई रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. कोपर स्थानकाला महत्त्व प्राप्त होत असताना मध्य रेल्वे प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रेल्वे स्थानक परिसरात काही राजकीय मंडळींच्या वरदहस्ताने बेकायदा झोपड्या, गाळे या भागात उभे राहिल्या बोलले जात आहे. रेल्वेची बांधकाम परवानगी न घेता उभ्या राहिलेल्या या बांधकामांवर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोपर स्थानकाचे महत्त्व लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या स्थानकाचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. नविन पादचारी पूल, तिकीट घर, प्रवाशांच्या सोयीसाठी जिने यांसारखी कामे या स्थानकात सुरू असून काही पूर्णत्वास आली आहेत. पण, या स्थानक परिसरातील मोकळ्या जागा बळकावण्यास काही भूमाफियांनी सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. कोपर पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत तसेच नाल्यावर बांधकाम करत त्यावर पत्र्यांचे चार ते पाच गाळे बांधण्यात आले आहेत. तर कोपर पूर्वेला दिवा वसई रेल्वे रुळाच्या उतारावरील जागा सपाट करुन त्यावर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. सुरुवातीला लाकडी किंवा पत्रे ठोकून या झोपड्या उभारल्या जातात. त्यानंतर विटा सीमेंटचे बांधकाम करुन ते गाळे, घरे पक्के करुन घ्यायचे अशी योजना या भूमाफियांची असते.

दिवा वसई रेल्वे मार्गालगत डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर या रेल्वेच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून हा प्रकल्प जात असून दिवा वसई रेल्वे मार्गालगत असलेल्या जुनी डोंबिवली, आयरे, कोपर, भोपर या भागातून हा प्रकल्प जात आहे. या प्रकल्पाचे काम एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला झोपडपट्टी धारकांनी रेल्वे रुळाच्या उताराची जमीन पोखरून त्याचे सपाटीकरण करून त्यावर झोपड्या उभारल्या आहेत. या बांधकामामुळे दिवा वसई रेल्वे रुळांना धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---
राजकीय वरदहस्त?
स्थानिक राजकीय मंडळींचा या ठिकाणी वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. वर्षानुवर्षे रेल्वेच्या जागा राजकीय मंडळींच्या जवळच्या लोकांनी बळकावल्या असून त्यावर बांधकाम केले आहे. हे बांधकाम ४० ते ५० वर्षे जुने असून ते अधिकृत असल्याचा दावा केला जातो. याप्रकरणी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.