
शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात
खर्डी, ता. १६ (बातमीदार) ः यंत्राद्वारे शेती करण्याच्या पद्धतीला आता शेतकरी सरावले आहेत. पण, ही पद्धत देखील शेतकऱ्यांना अधिक खर्चात टाकणारी ठरू लागली आहे. याचे कारण आहे डिझेलचे वाढते दर. त्यातच पारंपरिक साधन असणारी बैलजोडीची किंमतही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तर मजुरीचे दरही वाढल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतीतून निघणारे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा परिस्थितीमुळे शेतकरी नाडला जात आहे. त्यामुळे शेतकरी इतर पिकांच्या पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसत आहे.
पूर्वी बैलांच्या माध्यमातून शेती केली जात होती. त्यात बदल होऊन वेळेची बचत होते म्हणून ट्रॅक्टरद्वारे शेती कसली जाऊ लागली. मात्र, यंत्राद्वारे शेती करताना इंधनांचे दर, मजुरी, तसेच महागडी जंतूनाशके औषधे, खते आदींच्या किमती शेती व्यवसायाला परवडण्यासारख्या नाहीत. तसेच पावसाचा अनियमितपणा, वातावरणातील बदलांमुळे पिकांवर रोगांचा होणारा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कांदा, लसूण, मोगरा, आंबा, भेंडी, कलिंगड, शेवगा, कारले यांसारख्या पिकांची लागवड करण्याकडे शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहेत. या पिकांसाठी मेहनत व खर्च कमी असून जास्त आर्थिक फायदा होत असल्याचे खर्डी परिसरात हळदीचे उत्पन्न घेणाऱ्या रामनाथ उबरगोंडे यांनी सांगितले. दरम्यान, काही मोजके शेतकरी घरात खाण्यासाठी आपल्या शेतातील तांदूळ असावा यासाठी बैलजोडीद्वारे शेतीची कामे करत आहेत.
कोरोनाच्या प्रदूर्भावात मजूर मिळत नसल्याने मजुरीत भरमसाठ वाढ झाली. शेतीतील संकटांमुळे अधिक उत्पन्न मिळत नसल्याने बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतीच्या उत्पन्नासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. करोनाच्या सावटामध्ये शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत आहे. मात्र, मजूर मिळत नसल्यामुळे त्यांना यंत्रावर अवलंबून रहावे लागत असून अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.
----------------------------------------------------------------------
बेमोसमी पावसामुळे भातपिकासारखी शेती मेहनत व खर्च करूनही वाया जात आहे. त्यामुळे आता भात पिकासारखी शेती करणे मुश्किल झाले आहे.
- तुकाराम घोडंविंदे, शेतकरी.
----
शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंबा,काजू,चिकू,नारळ व मोगरा यासारखी पिके घेतल्यास कमी खर्च व मेहनत करून जास्त आर्थिक फायदा मिळतो. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी फळ व फुल झाडांची लागवड करावी.
- गोकुळ अहिरे, कृषी सहायक, खर्डी