
वाहतूक पोलिसांच्या कारवाईने मनस्ताप
कामोठे, ता. १६ (बातमीदार) : बेशिस्त वाहनचालकांनी रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे पनवेल, नवीन पनवेलमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे एकीकडे पनवेल शहरात प्रशस्त वाहनतळाची गरज भासत आहे; पण दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांचा वचक बसावा म्हणून वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात असल्यामुळे वादावादीचे प्रकार वाढले आहेत.
पनवेलमध्ये वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहने उभी करण्यासाठी पुरेसे वाहनतळ उपलब्ध नसल्याने वाहनचालक रस्त्यामध्ये वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी, वाहने उभी करण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी लाईन आळी, गार्डन हॉटेल ते स्वामी नित्यानंद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पंचरत्न चौक, नवीन न्यायालय, नवीन पनवेलमध्ये डी मार्ट, एचडीएफसी सर्कल मार्गे पनवेल रेल्वे स्थानक मार्गावर सम विषम तारखेला वाहने उभी करण्याला परवानगी दिली आहे. मात्र, पोलिसांनी नियोजित केलेली ठिकाणे अपुरी पडत असल्याने प्रशस्त वाहनतळाची गरज आहे.
------------------------------------------
टोईंग व्हॅनची कारवाई दुटप्पी
पनवेल, नवीन पनवेलमधील विविध सरकारी कार्यालय, दवाखाने, औषधविक्रीची दुकाने, हॉटेल्स, शाळा, महाविद्यालयांसमोर वाहने उभी करण्यासाठी अधिकृत जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मिळेल तिथे वाहने उभी करावी लागतात. या वाहनांवर वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्यामुळे नागरिक आणि पोलिसांत वाद होत आहेत.
-------------------------------------
रस्त्यामध्ये बेशिस्तपणे वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीची समस्या वाढत आहे. महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढली आहेत. वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. तसेच पनवेल परिसरात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे.
- संजय नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा पनवेल
----------------------------------------
वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅनची दादागिरी सुरू आहे. कारवाई करताना भेदभाव करतात. दुचाकी उचलताना कशीही उचलतात, त्यामुळे आर्थिक नुकसान होते.
- प्रफुल्ल पाटील, पनवेल