साहेब फक्त कामावर, कर्मचारी गेले संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहेब फक्त कामावर, कर्मचारी गेले संपावर
साहेब फक्त कामावर, कर्मचारी गेले संपावर

साहेब फक्त कामावर, कर्मचारी गेले संपावर

sakal_logo
By

जव्हार, ता. १६ (बातमीदार) : आदिवासीबहुल जव्हार तालुक्यात शासकीय योजनांकरिता लागणारे विविध दाखले आणि अर्ज भरण्यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातील अनेक नागरिक दाखल होत आहे; परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे कार्यालयात केवळ साहेब तेवढे कामावर असून कर्मचारी संपावर गेल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
ग्रामीण व शहरी भागातून येणाऱ्या नागरिकांमुळे तहसील कार्यालय नेहमी गजबजलेले असते; परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. १४) पासून संप पुकारल्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांतील अनेक कर्मचारी संघटनांनी १४ मार्चपासून संप पुकारला आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप चालूच राहील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला, तरी अधिकारी मात्र संपात नाहीत. त्यामुळे अधिकारी कार्यालयात येऊन बसलेले मिळाले. शासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू असला, तरी अधिकारी उरलेली कामे करून देतील, या भावनेने नागरिक कार्यालयात येत आहेत; परंतु कर्मचारी संपावर आहेत व तुमचे काम त्यांच्या टेबलवर आहे. तुमच्या कामातील त्रुटी काय आहेत, तुम्ही आता संप मिटल्यावरच या, असे सांगून अधिकारी वेळ निभावून नेत आहेत.

-------------------
जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्य व्यापी संप पुकारला आहे. कर्मचाऱ्यांची मागणी शासन मान्यही करेल; परंतु आम्हाला अनेक दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते. संप मिटेपर्यंत माझ्या मुलीसाठी आवश्यक असणारे महाराष्ट्र राज्य रहिवासी प्रमाणपत्रदेखील मिळणार नाही. त्यामुळे नुकसान होणार आहे.
- शंकर लोकरे, नागरिक

---------------
सरकारी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांचा संप किती दिवस चालणार, हे मात्र सध्या सांगणे कठीण आहे; परंतु आमचे काम मात्र टेबलावरच राहणार आहे.
- बशीर वांचेसा, नागरिक