
नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोंडी
वाशी, ता. १६ (बातमीदार)ः ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकाजवळ वर्दळीच्या वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारावरच होत असलेल्या मनस्तापामुळे वाहनचालक त्रस्त आहेत.
ठाणे बेलापूर मार्गावरच दिघा रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी पटनी कंपनीमार्गे शॉर्टकट असल्यामुळे दररोज हजारो वाहने जात आहेत. त्याचप्रमाणे ऐरोली नॉलेज पार्क येथे आयटी हब निर्माण झाल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल सुरू आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर कळवा विटावा या मार्गे येणारी वाहने मुंबईकडे जाण्यासाठी पटनी रस्त्यामार्गे जातात. या मार्गावर सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहनचालक कशाही पद्धतीने वाहन चालवून रस्ता जाम करतात. यामुळे प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांच्या चौकात रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक त्रस्त आहेत.
-----------------------------
सिग्नल नसल्यामुळे बेशिस्त वाहतूक
दिघ्याकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास एक किलोमीटर वाहनांची रांग लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे प्रस्तावित दिघा रेल्वे स्थानकांसमोर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी हटविण्यासाठी वाहतूक पोलिस या ठिकाणी कार्यान्वित असतात; पण सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे बेशिस्त वाहन वाहनांमुळे कोंडीत भर पडत आहे.
---------------------------------
दिघा रेल्वे स्थानकासमोर वाहतूक कोंडी होत असते. ती हटविण्यासाठी पोलिस तैनात असतात; पण भविष्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सिग्नल यंत्रणा असणे आवश्यक आहे. दिघा रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाल्यानंतर नियोजन करण्यात येईल.
- गोपाल कोळी, वाहतूक पोलिस निरीक्षक, रबाळे