
‘नवी मुंबई करंडक’ची आज महाअंतिम फेरी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः नवी मुंबई महापालिकेतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी सुरू होत आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहात सुरू झालेल्या या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील २० नाट्यसंस्थांनी सादर केलेल्या ४० एकांकिकांमधून १५ सर्वोत्तम एकांकिकांची निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांच्या कलागुणांना ‘नवी मुंबई करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धेलाही संपूर्ण राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी नवी मुंबई, पुणे व नाशिक अशा ३ केंद्रांवर झाली. यामध्ये नवी मुंबई केंद्रावर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील २० नाट्यसंस्थांनी प्राथमिक फेरीत एकांकिकांचे सादरीकरण केले. या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते शेखर फडके व रवी वाडकर यांनी या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. त्याचप्रमाणे पुणे केंद्रावरील प्राथमिक फेरीत सादर झालेल्या १० एकांकिकांचे आणि नाशिक केंद्रावरील १० एकांकिकांचे परीक्षण नामवंत रंगकर्मी वैभव सातपुते यांनी केले होते.
-----------------------------
‘तळमळ एका अडगळीची’ सर्वोत्तम बालनाट्य
नवी मुंबई महापालिकेतर्फे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान यांनी सादर केलेल्या ‘तळमळ एका अडगळीची’ हे बालनाट्य सर्वोत्तम ठरले आहे. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते त्यांना २५ हजार रकमेचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रासह प्रदान करण्यात आले. तसेच कखग, पुणे या बालनाट्य संस्थेने सादर केलेल्या ‘सात फेटेवाला’ या बालनाट्याने द्वितीय तसेच दिलखुश स्पेशल स्कूल या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या ‘वारी’ या बालनाट्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
-----------------------------------------
आज पारितोषिक वितरण सोहळा
४० एकांकिकांमधून १५ सर्वोत्तम एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली असून या एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सिद्धरुढ ठाणे या नाट्यसंस्थेने सादर केलेल्या ‘डिट्टो रखुमाई’ एकांकिकेने प्रारंभ झाला. उद्या (ता. १७) मार्चला अंतिम फेरीतील १५ एकांकिकांचे सादरीकरण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण कुमार सोहोनी व विजय केंकरे तसेच इला भाटे करणार आहेत.