ठाणेकरांनी अनुभवला कलाविष्काराचा संगम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणेकरांनी अनुभवला कलाविष्काराचा संगम
ठाणेकरांनी अनुभवला कलाविष्काराचा संगम

ठाणेकरांनी अनुभवला कलाविष्काराचा संगम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ठिपका चित्रांच्या प्रदर्शनात रसिक प्रेक्षकांनी तीन वेगवेगळ्या कलांचा एकत्रित स्वराविष्कार अनुभवला. ज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे, ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर व व्हायोलीन वादक मोहन पेंडसे यांनी एकाच वेळेला आपल्या कला सादर केल्या. हा कार्यक्रम शिल्पकला, चित्रकला आणि कलेविषयी व्याख्यानांचा संगम ठरला.

कर्नाटकातील सीमावर्ती भागातील मूर्तिशिल्पांची ठिपक्यांनी रेखलेली चित्रे ठाणेकरांना पाहता यावीत यासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे ज्येष्ठ चित्रकार विलास बळेल यांच्या ठिपका चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन ५ मार्च ते १२ मार्च दरम्यान भरवण्यात आले होते. यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांचे मूर्तिशिल्प प्रत्यक्ष बनवत असताना त्यांचे चित्र देखील रेखाटले जात होते. या दोन्ही कलांचे सादरीकरण होत असताना रसिकांना व्हायोलिनचे सुरेल संगीत ऐकण्याची संधी याप्रसंगी मिळाली.ज्येज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे यांनी मूर्तिकला या विषयाची सांगोपांग उकल केली. मूर्तीवर भावनांच्या छटा काढताना श्रोत्यांना ते प्रत्यक्ष पाहण्याचा अनोखा आनंद घेता आला.
डॉ. महेश बेडेकर यांनी मे महिन्यामध्ये संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या दुर्ग अभ्यास वर्गाची देखील माहिती दिली. संस्थेच्या नवनवीन उपक्रमांना ठाणेकरांनी आवर्जून प्रतिसाद द्यावा, असे संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी आवाहन केले.
----
ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर याप्रसंगी म्हणाले की, आज विद्यार्थ्यांना लहानपणीच चित्रकलेचे बाळकडू पाजण्याची गरज आहे. शाळांमधून चित्रकला हा विषय जवळपास हद्दपार झाला आहे. यासाठी शासनाला विनंती करून स्वाक्षरी मोहीम देखील हाती घेतली पाहिजे.