सजग नागरिकांची समाजाला गरज- शिक्षण तज्ज्ञ डॉ.महेश बेडेकर

सजग नागरिकांची समाजाला गरज- शिक्षण तज्ज्ञ डॉ.महेश बेडेकर

सजग नागरिकांची समाजाला गरज!
शिक्षणतज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांचे प्रतिपादन

मुलुंड, ता. १६ (बातमीदार) ः समाजातील विघातक गोष्टी रोखण्यासाठी सजग आणि जागरूक नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी व्यक्त केले. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घेणे नितांत गरजेचे असल्याचे सांगून योग्य आहार आणि व्यायामाकडे लक्ष देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विद्या प्रसारक मंडळाच्या के. ग. जोशी कला आणि ना. गो. बेडेकर वाणिज्य महाविद्यालयात (स्वायत्त) जागतिक महिला दिनानिमित्त झालेल्या महिला विकास कक्षातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ. अपर्णा बेडेकर, प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. मृण्मयी थत्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. नाईक यांनी बेडेकर दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करून महाविद्यालयाने आदर्श परंपरा निर्माण केल्याचेही त्या म्हणाल्या. डॉ. महेश बेडेकर यांच्या स्त्री-आरोग्यविषयक योगदानाबद्दल डॉ. नाईक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विविध सामाजिक प्रश्नांवर डॉ. महेश बेडेकर आणि अपर्णा बेडेकर यांची मुलाखत प्रा. अंजली पुरंदरे यांनी घेतली. बेडेकर आणि दाम्पत्यांना महाविद्यालयातर्फे मानपत्र देऊन गौरवण्यात आले. सामाजिक कार्य करताना तुमचा हेतू शुद्ध असेल तर कोणत्याही राजकीय अडथळ्याला घाबरण्याची गरज नाही, असे डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले. ‘प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ काढायला हवा. आपल्या मैत्रिणी हेच आपले माहेर असते हे लक्षात ठेवून हा गोतावळा जपण्यासाठी प्रयत्न करा,’ असा सल्ला डॉ. अपर्णा बेडेकर यांनी दिला. प्रास्ताविक महिला विकास कक्ष सेक्रेटरी डॉ. मृण्मयी थत्ते यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समिधा परब यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com