
बेकायदा झोपड्यांना राजकीय वरदहस्त
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटसमोरील सिडकोचे मोकळे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात सिडको प्रशासनाला अपयश आले आहे. सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अवजड वाहनांचे बेकायदा पार्किंग, गॅरेज सुरू असून राजकीय वरदहस्ताने बेकायदा झोपड्यांचे अतिक्रमणही वाढले आहे.
एपीएमसी दाणा बाजारच्या सेक्टर १९ एफच्या पूर्वला सिडकोने एपीएमसीसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांवर दिवसेंदिवस अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणामुळे सेक्टर २६ येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने या भूखंडांवरील अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी आता होत आहे. सिडकोच्या माध्यमातून वाशी सेक्टर १९ एफमध्ये भूखंड क्रमांक १ हा एपीएमसी निगडित कामाकरिता आरक्षित ठेवला आहे. मात्र कित्येक वर्षांपासून या भूखंडावर भूमाफियांकडून अतिक्रमण केले जात आहे. यापूर्वी या ठिकाणी झोपड्या बांधून पैसे उकळल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून याबाबत सिडको प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र, कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.
-------------------------
रात्रीचे जुगाराचे अड्डे
झोपडपट्टी वाढल्याने येथे जुगाराचे डाव रंगत आहेत. तसेच हे ठिकाण अमली पदार्थ विक्रेत्यांचे आश्रयस्थान असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकारचा मनस्ताप सेक्टर २६ मधील रहिवाशांना सहन करावा लागत आहे, तर काही झोपडपट्टी दादांनी येथील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात झोपड्या बांधल्या असून काही राजकीय मंडळींच्या वरदहस्ताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
------------------------------------
सिडको प्रशासनाकडे याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे, पण कारवाई झाली नाही. ही जमीन सिडकोच्या मालकीची आहे. त्यामुळे कारवाई करण्याची जबाबदारीही सिडकोची आहे.
- संकेत डोके, अध्यक्ष, नवी मुंबई विकास अधिष्ठान
---------------------------------
एपीएमसी दाणा बाजारच्या सेक्टर १९ एफच्या पूर्वेला सिडकोने एपीएमसीसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांवरील अतिक्रमणाबाबत संबंधित विभागाला सांगून योग्य ती कारवाई लवकरच केली जाईल.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको