मानवनिर्मित वनव्यांमुळे वनसंपदा बेचिराख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानवनिर्मित वनव्यांमुळे वनसंपदा बेचिराख
मानवनिर्मित वनव्यांमुळे वनसंपदा बेचिराख

मानवनिर्मित वनव्यांमुळे वनसंपदा बेचिराख

sakal_logo
By

मनोर, ता. १६ (बातमीदार) : मानवनिर्मित वणव्यांच्या आगीत पालघर जिल्ह्यातील जंगले जळत आहेत. वणव्यांमुळे हजारो हेक्‍टरवरील वनसंपदा जळून खाक होत असून आगीमुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्‍यात आला आहे. वणवे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी वन विभागाकडून केला जात असलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात असल्याचे समोर येत आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे कृती आराखडा नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केला जात आहे. वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आणि अद्ययावत तांत्रिक साह्य नसल्याने जंगले जळून खाक होत आहेत.

वणवे रोखण्यासाठी जंगल क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती आणि वनपाल-वनरक्षक स्तरावरील वनकर्मचाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ आणि अद्ययावत यांत्रिक साह्य उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत सुमारे दीड ते दोन लाख हेक्‍टर वनक्षेत्र आहे. या जंगलात खैर, साग, शिसमसारख्या मौल्यवान झाडांसह हजारो अन्य प्रकारची झाडे आहेत. शेकडो प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास आहे.
दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला मानवनिर्मित वणवे लावण्यास सुरुवात होते. वणव्यांमुळे वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत.

---------------
उपाययोजनांसाठी खटाटोप
वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी वन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असतात. वनपाल, वनरक्षक आणि वनमजुरांच्या माध्यमातून जंगलात गस्त घालून लक्ष ठेवले जाते. वणव्यांची आग जंगलात पसरू नये यासाठी झाडांखाली पडलेला पाळा-पाचोळा चर पद्धतीने हटवणे, वणवे विझवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांकडून स्थानिक ग्रामस्थांचे साह्य घेतले जाते. वाहनचालकांकडून रस्त्यालगत लावलेली आग पसरू नये यासाठी जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यालगतचा पाळापाचोळा जमा करून जाळून टाकला जातो. या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो.

----------------
५०० हेक्टर वनक्षेत्राची जबाबदारी तिघांवर
सध्याच्या परिस्थितीत ५०० हेक्टर वनक्षेत्राची राखण एक वनपाल एक वनरक्षक आणि एक वन मजूर करत आहेत. वणवे विझवण्यासाठी एक पेट्रोल इंधनावर चालणार पंखा (ब्लोअर) उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या क्षेत्रात लागलेला वणवा तीन ते चार लोकांच्या मदतीने विझवणे शक्य होत नसल्याची भावना वन रक्षक आणि वन मजुरांकडून खासगीत बोलून दाखवली जात आहे. वणवे रोखण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी उदासीन भूमिका घेत आहेत. जळणाऱ्या जंगलाची माहिती देण्यासाठी केले जाणारे फोन स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी उचलत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करताना वणव्यात जळालेल्या जंगलाचे क्षेत्र कमी दाखवण्याचा खटाटोप केला जात आहे.

----------------
वणवे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जंगलात आग लागल्यास सॅटेलाइट यंत्रणेच्या माध्यमातून सूचना प्राप्त होत असतात. त्यानंतर अर्ध्या तासात वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवतात. वणवे रोखण्यासाठी वेगळी टीम नियुक्त करण्यात आली आहे. जंगलात आग लागल्याचे निदर्शनास आल्यास आगीचे ठिकाण आणि फोटो वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना तसेच मला पाठवल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.
- गजानन सानप, सहायक वनसंरक्षक, पालघर