‘मालमत्ता कर भरणार नाही’ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मालमत्ता कर भरणार नाही’ !
‘मालमत्ता कर भरणार नाही’ !

‘मालमत्ता कर भरणार नाही’ !

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असलेल्या पलावा सिटीमधील २५ हजार फ्लॅटधारकांना मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा सरकारचा जीआर असतानाही त्याची अंमलबजावणी पालिका स्तरावर केली जात नाही. येथील मालमत्ताधारकांकडून दुहेरी कर वसूल केला जात आहे. याविषयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे वारंवार पालिका स्तरावर पाठपुरावा करीत आहेत. मात्र, पालिका प्रशासन त्यांना केवळ आश्वासन देत आहेत. यामुळे आता आमदार राजू पाटील यांनी जोपर्यंत मालमत्ता करात हक्काची सवलत मिळत नाही, तोपर्यंत मालमत्ता कर भरणार नाही, अशा आशयाचे बॅनर पलावा येथे झळकविले आहेत. आमदार पाटलांच्या या भूमिकेला पलावावासियांचा पाठिंबा मिळत असून पालिकेला एक प्रकारे खुले आव्‍हान पाटील यांनी दिले आहे.

डोंबिवलीजवळील पलावा ही इंटिग्रेटेड टाऊनशीप आहे. या टाऊनशीपला मान्यता देताना सरकारने बिल्डरला काही सवलती दिल्या होत्या. त्याप्रमाणे त्या ठिकाणी घरे घेणाऱ्या मालमत्ताधारकांस त्याच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट दिली जाणार होती. त्याचा जीआर सरकारने सन २०१६ मध्ये काढला आहे; तरीही पालिकास्तरावर या जीआरची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केली जात नाही. २५ हजार फ्लॅटधारकांकडून जवळपास १५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. याविषयी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.