
पार्किंगचे नियम पायदळी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १६ ः नवी मुंबई महापालिकेकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेले वाहनतळांचे नियोजन ढेपाळल्यामुळे शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी पार्किंगबाबतच्या नियमांची झालेली पायमल्ली कारणीभूत असून शहरातील मोठी शैक्षणिक संकुले, आलिशान मॉल्स, रुग्णालये आणि सीएनजी पंपासारख्या वाणिज्य संस्थांकडून रस्त्यांच्या होणाऱ्या बेकायदेशीर वापरामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.
सुटसुटीत आणि मोकळ्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नवी मुंबईतही संध्याकाळच्या वेळी बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्यांना वाहने उभी करण्यासाठी रोज जागा शोधण्याची वेळ येत आहे. बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, महापे, तुर्भे, ऐरोली अशा सर्व नोड्समधील स्थानिक बाजारपेठांमध्ये रस्ते संध्याकाळी वाहनांनी व्यापलेले असतात. या परिस्थितीला शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांसारख्या संस्थांसमोरील रस्त्यांचा होणारा बेकायदा वापरही कारणीभूत आहे. कारण या संस्थांकडून भोगवटा प्रमाणपत्रात येणाऱ्या वाहनांची अंतर्गत जागेत व्यवस्था करण्याच्या नोंदवलेल्या अटीचे उल्लंघन करण्यात आले असून सध्या वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. विशेष म्हणजे, या संस्थांकडून महापालिकेच्या रस्त्याचा बेकायदा वापर केला जात आहे. तसेच अंतर्गत वाहनतळ बंद ठेवून इमारतीच्या बाहेरच्या रस्त्यावर संस्थेमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांची वाहने उभी केली जात असल्याने पर्यायी मार्गाने बाहेर जाणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यास जागा शिल्लकच नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
------------------------------------------------
मोठ्या संस्थांकडून सर्रास उल्लंघन
२५० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अभियांत्रिकी महाविद्यालय असे हजारो एकरावर विविध शैक्षणिक आणि क्रीडा संकुल थाटलेल्या नेरूळमधील एका संस्थेकडून सर्रासपणे वाहनतळ नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. या संस्थेने रुग्णालयाची इमारत उभारताना दाखवलेल्या वाहनतळाच्या जागेत दुसरी इमारत उभारली आहे. स्टेडियम शेजारच्या सेवा रस्त्यावर प्राध्यापक, खेळाडू, विद्यार्थी आणि अभ्यागतांची वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे सेवा रस्त्यावर ताण येऊन वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. अशी परिस्थिती सर्वच शैक्षणिक संकुले आणि रुग्णालयांच्याबाहेर आहे.
------------------------------
सीएनजी पंपांना रस्ते आंदण
नवी मुंबई शहरात सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूड्स, जुईनगर, वाशी, कोपरखैरणे आदी ठिकाणी रहिवासी भागात सीएनजी पंप उघडले आहेत. या पंपांच्या आवारात फक्त दोन किंवा तीन-चार चाकी वाहने उभी राहू शकतात, एवढीच जागा असते. पंपात सीएनजी भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांना जागा नसल्याने त्यांच्या रांगा लागून पंपाबाहेरच्या रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी राहतात. प्रत्यक्षात त्या वाहनांचा फायदा संबंधित सीएनजी पंप मालकाला होत असतो; परंतु प्रतीक्षा करण्यासाठी ज्या रस्त्यावर ती वाहने उभी असतात, तो रस्ता महापालिकेचा असून त्याबाबत महापालिकेला सोयरसुतक नाही.
---------------------------
कारवाई करण्याकडे कानाडोळा
सीबीडी-बेलापूर, सीवूड्स, नेरूळ, वाशी, ऐरोली येथील संस्थांच्या बाहेरच्या रस्त्यांवर हक्काने वाहने उभी केली जातात. अशा संस्थांवर महापालिकेतर्फे कारवाई केली जात नाही. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास परवानगी देण्याऐवजी पर्यायी भूखंडांवर वाहनतळ उभारण्याच्या कामाला महापालिकेने गती देण्याची आवश्यकता आहे.
--------------------------------
शहरातील पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक बैठक बोलावली होती. या बैठकीला महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वाहतूक पोलिसही उपस्थित होते. वाहनतळाचे भूखंड, सध्या सुरू असलेल्या वाहनतळाच्या कामाची परिस्थिती आणि वाहनतळांच्या दराबाबत माहिती घेतली. ज्या संस्था इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था असूनही वापर करीत नसतील त्यांच्यावर कारवाई होईल.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका